
आणीबाणीविषयी प्रत्येकाची मते, विचार वेगळे असतील. पण, त्या कालखंडात कराडच्या संमेलनात दुर्गाबाई भागवत यांनी आवाज उठवला होता हे विसरू नका.
स्वातंत्र्य चळवळीविषयी वादग्रस्त विधान करीत एका महिलेने या चळवळीतील सगळ्या घटकांचा अपमान केला तरीही एकही साहित्यिक बोलला नाही, अशी खंत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली. लेखक, साहित्यिकांची ताकद मोठी असते, त्यात राजकारण बदलण्याची क्षमता असते. साहित्यिकांनी गरज पडेल त्या-त्या वेळी परिणामांचा विचार न करता बोललेच पाहिजे, असे परखड मतही त्यांनी मांडले.
संमेलन समारोपाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून थोरात बोलत होते. यावेळी त्यांनी अभिनेत्री कंगना राणावत आणि विक्रम गोखले यांच्यावर नाव न घेता टीकास्त्र्ा सोडले. ते म्हणाले की, आणीबाणीविषयी प्रत्येकाची मते, विचार वेगळे असतील. पण, त्या कालखंडात कराडच्या संमेलनात दुर्गाबाई भागवत यांनी आवाज उठवल्याची आठवण सांगितली. जिथे चुकते तिथे बोललेच पाहिजे, राजकारण बदलण्याची ताकद साहित्यिकांमध्ये आहे. आज आपण मौन धरले तर उद्या कोणीही राज्यघटनेवर बोलायलाही कमी करणार नाही. संकट दारापर्यंत येवूनही आपण गप्प राहिलो तर ते योग्य नाही. सध्या कट्टरवाद वाढला आहे, त्यातून सत्तेवर जाण्यासाठी मतं संकलनाची सोप्पी पद्धत हल्ली दिसतेय. पण, अशा पद्धतीने मिळालेली सत्ता टिकत नाही हे सांगताना त्यांनी अमेरिकेतील ट्रम्प सरकारचा दाखला दिला. तेथील मीडियाची भूमिका प्रभावी ठरली असे सांगितले. आपल्या राज्यघटनेप्रमाणे देश चालावा यासाठी आम्ही राजकारणी कमी पडत असू, तर तुम्ही लेखक, कवी, गायकांनी सांगितले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
























































