
डॉक्टरकीची पदवी नसतानाही रुग्णाच्या जीवाशी खेळणाऱ्या मुन्नाभाईला क्राईम ब्रँच युनिट 8 ने कांदिवली येथून अटक केली. केसरीप्रसाद रामदेवर यादव असे त्याचे नाव आहे. त्याला पुढील तपासासाठी कांदिवली पोलिसांच्या ताब्यात दिले. चार वर्षांपूर्वी देवनार येथे मुन्नाभाईने चुकीचे इंजेक्शन दिल्याने तरुणाचा मृत्यू झाला होता. त्याची दखल घेत पोलिसांनी अशा मुन्नाभाईंवर कारवाईस सुरुवात केली. कांदिवली पश्चिमच्या हिंदुस्थान नाका येथील इस्लाम पंपाऊंडमध्ये बोगस डॉक्टर असल्याची माहिती युनिट 8 ला मिळाली. प्रभारी पोलीस निरीक्षक मधुकर सानप यांच्या पथकातील सहायक निरीक्षक शेलकर, तावडे, सुतार यांचे पथक शनिवारी कांदिवली येथे गेले. पालिकेच्या डॉक्टरांच्या मदतीने पोलिसांनी केसरीप्रसादच्या के. पी. यादव क्लिनिकमध्ये छापा टाकला. केसरीप्रसादकडे वैद्यकीय पदव्यांबाबत विचारणा केली तेव्हा महाराष्ट्र वैद्यक परिषदेकडे कोणतीही नोंद नसल्याचे पोलिसांना समजले.


























































