
ओमायक्रोनच्या पार्श्वभूमीवर आरोग्य कर्मचारी, अन्य महत्त्वाचे कर्मचारी आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीचा अतिरिक्त डोस देण्यात यावा अशी विनंती इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) सरकारला केली आहे. त्याचप्रमाणे 12 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्यात यावे, अशीही मागणी आयएमएने केली आहे.
ओमायक्रोनचे देशात आतापर्यंत 21 रुग्ण सापडले आहेत. देशाच्या महत्त्वाच्या राज्यांमध्ये हे रुग्ण सापडले आहेत. ज्या देशांमध्ये हा विषाणू सापडला तिथे त्याचा झपाटय़ाने प्रसार झाल्याचे शास्त्रीय पुरावे आहेत. हिंदुस्थानात कोरोनाच्या दोन लाटा झाल्यानंतर दैनंदिन व्यवहार पूर्ववत सुरू झाले आहेत. आता ओमायक्रोनच्या संकटात वेळीच उपाययोजना केल्या नाहीत तर तिसरी लाट येऊ शकते, असा इशाराही आयएमएने पत्रकार परिषदेत दिला.
देशात आतापर्यंत 126 कोटी नागरिकांचे लसीकरण झाले आहे. सुमारे 50 टक्के प्रौढांनी एक तरी डोस घेतला आहे. लसीकरणामुळे कोरोनाचा संसर्ग कमी होतो हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे आपण लसीकरणावर लक्ष केंद्रित केले तर ओमायक्रोनचा यशस्वीरित्या सामना करू शकतो असे आयएमएने म्हटले आहे. ओमायक्रोनची लक्षणे तीव्र नसली तरी तो डेल्टा व्हेरिएंटपेक्षा पाच-दहा टक्के अधिक वेगाने पसरू शकतो. त्यामुळे लसीकरणावर अधिकाधिक जोर दिला पाहिजे, असे आयएमएने म्हटले आहे.




























































