
हिंदुस्थानच्या टी-20 संघाचा नवा कर्णधार बनलेल्या रोहित शर्माकडे एकदिवसीय संघाचे नेतृत्वही सोपविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय ‘बीसीसीआय’ने बुधवारी घेतला. विराट कोहलीने स्वतःवरील कामाचा ताण कमी करण्यासाठी टी-20 विश्वचषक स्पर्धेनंतर टी-20 संघाचे कर्णधारपद सोडले, मात्र एकदिवसीय संघाचे कर्णधारपद त्याने सोडले नव्हते. बुधवारी ‘बीसीसीआय’ची एक मोठी बैठक झाली. यामध्ये रोहित शर्माच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने सर्वाधिक पाच वेळा आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे. त्याचबरोबर आतापर्यंत जेव्हा विराट कोहलीच्या गैरहजेरीत रोहितने हिंदुस्थानी संघाचे नेतृत्व केले तेव्हा संघाने चमकदार कामगिरी केलेली आहे. मात्र आता रोहितकडेच हिंदुस्थानच्या टी-20 आणि एकदिवसीय संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. त्यामुळे रोहित आता टीम इंडियाची धुरा कसा सांभाळतो याकडे तमाम क्रिकेटशौकिनांचे लक्ष असेल.
हिंदुस्थानचा कसोटी संघ ः विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), के.एल. राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, रिषभ पंत (यष्टिरक्षक), वृद्धीमान साहा (यष्टिरक्षक), आर अश्विन, जयंत यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज. राखीव खेळाडू ः नवदीप सैनी, सौरभ कुमार, दीपक चाहर.
रोहितकडेच कसोटी संघाचे उपकर्णधारपद
दक्षिण आफ्रिका दौऱयासाठी हिंदुस्थानच्या 18 सदस्यीय कसोटी क्रिकेट संघाची बुधवारी घोषणा करण्यात आली. कसोटी संघाचे कर्णधारपद विराट कोहलीकडे कायम आहे. अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा आणि इशांत शर्मा यांच्याबद्दल दीर्घ चर्चा केल्यानंतर अखेर निवड समितीने या तिघांनाही एक संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या कसोटी मालिकेसाठी अजिंक्य रहाणे नव्हे तर रोहित शर्माकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे.


























































