
दाटीवाटी वस्तीच्या धारावीत कोरोना व्हेरिएंट ओमायक्रोनचा रुग्ण आढळल्याने प्रशासनाने प्रसार रोखण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये घरोघरी लसीकरण, सार्वजनिक शौचालयांचे दिवसातून पाच वेळा सॅनिटायझेशन आणि विशेष मोहिमेत मोफत कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली.
मुंबईत कोरोना रुग्णसंख्या पूर्ण नियंत्रणात असली तरी ओमायक्रोन व्हेरिएंटने टेन्शन वाढवले आहे. त्यामुळे रिस्क कंट्रीजमधून आलेल्यांना सात दिवसांचे क्वारंटाइन बंधनकारक करण्यात आले, तर बाधित आढळणाऱ्यांची ‘आरटी-पीसीआर’ चाचणी केली जात आहे. दाटीवाटीच्या धारावीत यासाठी प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यासाठी त्रिसूत्री बनवून काम सुरू करण्यात आल्याचे दिघावकर यांनी सांगितले.
असे होतेय काम
धारावीत 18 वर्षांवरील पात्र लाभार्थ्यांची संख्या 4 लाख 80 हजार असली तरी या ठिकाणी कामानिमित्त येणाऱ्यांमुळे हा आकडा सात ते आठ लाखांवर जातो.
धारावीत 80 टक्के लोक सार्वजनिक शौचालयाचे वापर करतात. संपूर्ण धारावीत 450 सार्वजनिक शौचालये आहेत. या सर्व ठिकाणी सोडियम हायड्रोक्लोराइडने दिवसातून पाच ते सहा वेळा सॅनिटायझेशन केले जात आहे.
हातावर पोट असलेल्यांसाठी पालिकेच्या माध्यमातून मोफत चाचणी, घरोघरी व्हिजिट करून लसीकरण.
दिलासादायक! मुंबईत दुसऱ्यांदा ‘शून्य मृत्यू’ नोंद
ओमायक्रोनचा धोका वाढलेला असताना आज पुन्हा एकदा दिवसभरात ‘शून्य मृत्यू’ नोंद झाल्याने मुंबईला दिलासा मिळाला आहे. गेल्या 20 महिन्यांहून जास्त काळ कोरोनाचा विळखा असताना सद्यस्थितीत रुग्णसंख्या चांगलीच नियंत्रणात आली आहे. मुंबईत आता फक्त 1808 सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईत आज दिवसभरात 236 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्णसंख्या 765110 झाली असली तरी यातील 744370 जणांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे. असे असले तरी कोरोनामुळे आतापर्यंत 16355 मृत्यू झाले आहेत. त्यामुळे दिवसभरात एकही मृत्यू न होणे ही दिलासादायक गोष्ट आहे. याआधी फक्त 17 ऑक्टोबर 2021 रोजी शून्य मृत्यू नोंद झाली होती.





























































