
चंद्रपूर जिल्ह्यातील सहा नगर पंचायतेच्या निवडणूका होत आहेत. सावली, गोंडपिपरी, पोंभुर्णा, कोरपणा, जिवती आणि सिंदेवाही-लोनवली या नगर पंचायतेत राजकीय वातावरण तापले आहे. ओबीसी प्रवर्गातील 20 जागा वगळता 84 जागावर 423 उमेदवार रिंगणात आहेत. नामांकन अर्ज माघारी घेण्याची सोमवारी अंतिम तारीख होती. जिवती नगर पंचायतेत एकूण 52 उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केला होता. त्यापैकी 9 उमेदवारांनी अर्ज माघारी घेतला आहे. 35 उमेदवार रिंगणात आहेत. सावली नगर पंचायतमधील एका उमेदवारांना अर्ज माघारी घेतला. सिंदेवाही येथील सात, कोरपना सात, गोंडपिपरी तीन अशा एकूण 27 उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे आता सहा नगर पंचायतीसाठी 423 उमेदवार रिंगणात आहेत.
वडेट्टीवार, मुनगंटीवार, धोटेंची प्रतिष्ठा पणाला
पालकमंत्री विजय वडेट्टीवारांच्या विधानसभा क्षेत्रातील सावली,सिंदेवाही,आमदार सूधीर मुनगंटीवारांच्या विधानसभा क्षेत्रातील पोंभुर्णा तर आमदार सूभाष धोटे यांच्या क्षेत्रातील जिवती,कोरपणा,गोंडपिपरी नगर पंचायत निवडणूका होत आहेत.आपला गड राखण्यासाठी या नेत्यांनी कंबर कसली आहे.भाजपा-काँग्रेसमध्ये थेट लढत होणार आहे, अशी शक्यता वर्तविली जात आहे. मात्र इतर पक्ष भाजप आणि काँग्रेसचे गणित बिघडवू शकतात ,असे शक्यता आहे.
निर्णयाची प्रतिक्षा
स्थानिक स्वराज्य संस्थानाचा निवडणूकामध्ये ओबीसी समाजाला 27 टक्के आरक्षण देता येणार नाही,असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. त्यानुसार चंद्रपूर जिल्ह्यात होणाऱ्या ओबीसी प्रवर्गातील 20 जागांवरील निवडणूका राज्य निवडणूकांना आयोगाने स्थगिती दिली. त्याचा निर्णय अपेक्षित होता.मात्र, अद्याप निवडणूक आयोगाचे निर्देश प्राप्त झाले नाहीत.ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना निर्णयाची प्रतिक्षा आहे.






















































