
बनावट कागदपत्रांच्या आधारे हिंदुस्थानचा पासपोर्ट बनविणारी भाजप पदाधिकाऱ्याची पत्नी रेश्मा खान अजून पोलिसांना सापडलेली नाही. पोलिसांनी तीन ठिकाणी जाऊन तिचा शोध घेतला, पण तिचा काहीच थांगपत्ता लागला नाही.
मूळची बांगलादेशची असलेली रेश्मा खान हिने पश्चिम बंगालमधील बोगस कागदपत्रांच्या आधारे 2012 मध्ये हिंदुस्थानचा पासपोर्ट बनवला होता. 2017 मध्ये मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेच्या आय ब्रँचच्या ही बाब लक्षात आली. त्या ब्रँचचे माजी वरिष्ठ निरीक्षक दीपक कुरूळकर यांनी ही बाब मालवणी पोलिसांना लेखी स्वरूपात कळवून कारवाई करण्यास सांगितले होते, मात्र तेव्हाचे मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दीपक फटांगरे यांनी कारवाई करण्यास चालढकलपणा केला होता. त्यानंतर मुंबईचे माजी सहआयुक्त देवेन भारती यांनी या प्रकरणात जास्त लक्ष घालू नका, असे कुरुळकर यांना बजावले होते. दरम्यान, याप्रकरणी कुरुळकर यांच्या तक्रारीनंतर गुन्हे शाखेच्या सीआययू युनिटने मालवणी पोलीस ठाण्यात रेश्मा खान, निवृत्त एसीपी दीपक फटांगरे आणि अप्पर पोलीस महासंचालक देवेन भारती यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. सीआययू युनिट रेश्माचा शोध घेत आहेत, पण ती वॉण्टेड झाली आहे. पोलिसांनी ती राहत असलेल्या तिन्ही पत्त्यावर जाऊन शोध घेतला, पण ती सापडली नाही. पोलिसांनी रेश्माच्या पतीला नोटीस बजावून चौकशीसाठी बोलावले आहे.



























































