
वाहतूक नियमांची अंमलबजावणी न करणे वाहनचालकांना चांगलेच महागात पडणार आहे. नगर वाहतूक पोलिसांनी शासननिर्णयानुसार सुधारित दंडआकारणी लागू केली असून, विनापरवाना वाहन चालविणाऱयांना आता 500 रुपयांऐवजी थेट पाच हजारांचा दंड भरावा लागणार आहे. नव्या दंड आकारणीनुसार आता नियमभंगासाठी किमान दंडाची रक्कम 200ऐवजी थेट 500 रुपयांवर पोहोचली आहे.
ट्रिपलसीटसाठी दंड आकारणी थेट पाचपट झाली आहे. त्यामुळे आता 200 रुपयांऐवजी एक हजार रुपये दंड होईल. पुन्हा ट्रीपलसीट सापडल्यास तीन महिने परवाना अवैध ठरविला जाणार आहे. परवान्याशिवाय वाहन चालविल्यास आता थेट पाच हजार रुपये दंड होणार आहे. यात न्यायालयात खटला दाखल करण्याचीही तरतूद आहे. दुसऱयांदा किंवा पुनःपुन्हा सापडल्यास दंडासोबत तीन महिन्यांसाठी परवाना अवैध ठरविला जाणार आहे. शिकाऊ वाहनचालकाने ‘एल’ बोर्डशिवाय वाहन चालविले, तर 200ऐवजी 500 आणि पुन्हा नियम मोडल्यास 1500 रुपये दंड होणार आहे. गाडी चालविताना मोबाईल वापरणाऱयांना 200 रुपये दंड आकारला जात होता, तो आता 500 रुपये झाला आहे. हाच नियम पुन्हा मोडणाऱयांना 1500 रुपयांचा दंड होणार आहे.
पोलिसांच्या इशाऱयांकडेही लक्ष द्या!
पोलीस इशाऱयाचे पालन केले नाही, तर 200ऐवजी आता 500 रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. पुन्हा तीच चूक केली, तर 1500 रुपये दंड होईल. कारच्या काचांना ब्लॅक फिल्म लावल्यास 200ऐवजी 500 रुपये दंड भरावा लागेल. पहिल्या दंडानंतरही काळी फिल्म कायम ठेवल्यास पुन्हा 1500 रुपये दंड भरण्याची तयारी कारमालकांना ठेवावी लागेल. मादक द्रव्याचे सेवन करून वाहन चालविणाऱयांना थेट न्यायालयात खटला चालविला जाणार आहे.
हेल्मेट नसल्यास 500 रुपये दंड
विनाहेल्मेट, मोबाईलचा वापर, सीटबेल्टचा वापर न करणे यांसाठी प्रत्येकी 500 रुपये दंड, मोबाईल व सीटबेल्टचे पुन्हा उल्लंघन केल्यास प्रत्येकी 1500 रुपये दंड, तर हेल्मेट नियमाचे दुसऱयांदा उल्लंघन केल्यास लायसन्स तीन महिन्यांकरिता बाद करण्यात येणार आहे. चुकीच्या दिशेने वाहन चालविणाऱयांची आता दंड भरून सुटका होणार नाही. आधी 1000 रुपये दंड भरावा लागत होता, आता थेट न्यायालयात खटला दाखल केला जाणार आहे. कर्णकर्कश हॉर्न वाजविणाऱयांनाही एक हजारचा दंड भरावा लागाणार आहे. आधी हा दंड 200 रुपये होता. हॉर्न वाजवून पुन्हा डोकेदुखी वाढविली, तर थेट दोन हजारांचा दंड होणार आहे.























































