
>> डॉ. विलास नांदूरकर
जनरल बिपीन रावत हे देशाचे पहिले सरसेनाध्यक्ष होते. हिंदुस्थानी लष्कराचा त्यांच्या आक्रमक व्यूहरचनेमुळे शेजारी देशात दबदबा होता. पाकिस्तान आणि चीनला सडेतोड उत्तर देतानाच त्यांनी हिंदुस्थानी लष्कराचे आधुनिकीकरण विशेष पद्धतीने केले. हिंदुस्थानी लष्कर सक्षम करण्यात त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. देशाचा नवयुवक, विशेषतः विद्यार्थी हा बलशाली, मानसिकरीत्या मजबूत, कठीण प्रसंगाचा सामना करणारा आणि सदैव हौसला बुलंद ठेवणारा असावा या मताचे ते होते.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे हे यापूर्वी एआयसीटीई, नवी दिल्लीमध्ये वरिष्ठ सल्लागार वर्ग – 1 या पदावर कार्यरत होते. त्यावेळी त्यांनी जनरल बिपीन रावत सरांची भेट घेऊन उच्च शिक्षणावर चर्चा केली. हिंदुस्थानी शिक्षण कसे असावे, विद्यार्थ्यांचा सर्वसमावेशक आणि सर्वांगीण विकास कसा होईल, देशाविषयी त्यांच्या मनात सदैव गौरव कसा राहील आणि त्यादृष्टीने देशाच्या विकासामध्ये त्यांचे योगदान यांसह अनेक गोष्टींवर भेटीदरम्यान चर्चा झाली. कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांनी रावत यांना देशभरातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देण्यासाठी येण्याची विनंती केली, तेव्हा त्यांनी क्षणाचाही विलंब न करता ‘‘मला विद्यार्थ्यांना व्याख्यानातून विचार देण्यामध्ये आनंदच होईल. डॉ. मालखेडेजी, आपण व्याख्यानाचं निश्चित आयोजन करा, मला विद्यार्थ्यांना भाषण देण्यामध्ये खूप आनंद होईल.’’
कुलगुरू डॉ. मालखेडे यांच्या विनंतीला मान देऊन जनरल बिपीन रावत यांनी देशभरातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन व्याख्यान दिले. त्यांनी आपल्या व्याख्यानातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण मुद्दय़ांवर भर दिला. अनेक महापुरुषांचे दाखले दिले. विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन कसा असावा, विवेकशीलता, देशाप्रति प्रेम, कौशल्य आत्मसात करण्याची सदैव जिद्द, कार्याची प्रभावीपणे अंमलबजावणी, शिस्त यांशिवाय त्यांच्यामध्ये मौलिक गुण असायला हवेत. विद्यार्थी हा प्रामाणिक असला पाहिजे, तो सदैव उत्साही, त्याच्यामध्ये कार्याप्रति निष्ठा असायला हवी. वरिष्ठांबद्दल आदरभाव, सकारात्मक विचार त्याने सदैव बाळगावा. सहकार्य, समन्वय, कृतज्ञता, दया, देशाप्रति निष्ठा, सामाजिक जाण हे गुणसुद्धा त्याच्यामध्ये असायला हवेत. विद्यार्थ्यांनी मिळालेल्या संधीचे सोने करण्याचे प्रामाणिक प्रयत्न सातत्यपूर्ण करायला हवेत. त्यांच्या प्रयत्नांमध्ये सातत्य असायला हवे, यांसह त्यांनी शैक्षणिक व संरक्षणविषयक विषयांवर विद्यार्थ्यांना उत्कृष्ट मार्गदर्शन केले होते.
डॉ. मालखेडे सरांच्या प्रयत्नांमुळे देशभरातील विद्यार्थ्यांसाठी एका अर्थाने ती ज्ञानाची व अनुभवाची मेजवानीच होती. हिंदुस्थानी विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्यासाठी महत्त्वपूर्ण असं ते व्याख्यान होते. सैन्यामधील सैनिकांना व अधिकाऱ्यांना त्यांनी दिलेली भाषणं प्रेरणादायी राहिली आहेत. आज बिपीन सर आपल्यात नाहीत ही हिंदुस्थानींसाठी खूप वेदनादायी घटना आहे. त्यांचं अनुभव, आक्रमकता, व्यूहरचना, शत्रूला सडेतोड उत्तर देणारा असं व्यक्तिमत्त्व आज आपल्यात नाही, त्यामुळे हिंदुस्थानची फार मोठी हानी झाली आहे.
जनरल बिपीन रावत यांची देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) या पदावर नियुक्ती झाली. त्यांच्या नेतृत्वाखाली लष्कराचे आधुनिकीकरण, तिन्ही दलांच्या एकत्रित कारभारासाठी थिएटर कमांडची निर्मिती प्रक्रिया त्यांनी सुरू केली. आपला शत्रू चीनला प्रत्युत्तर देण्यात त्यांचे मोठे योगदान होते.
विद्यार्थ्यांनी जनरल बिपीन रावत यांच्या विचार व कार्यापासून प्रेरणा घ्यावी, हीच खरी श्रद्धांजली ठरेल असे मत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांनी व्यक्त केलं.
(लेखक संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी आहेत.)
























































