
पालघर जिह्यातील अतिदुर्गम जव्हार तालुक्यातील झाप गावात आज लसीचे 300 डोस घेऊन चक्क ड्रोन भिरभिरत पोहोचले. आरोग्य विभागाने केलेल्या देशातील या पहिल्याच प्रयोगाने यशस्वी ‘उड्डाण’ केले असून झापवासी लसवंत झाले आहेत. आदिवासी भागातील ही मोहीम फत्ते करण्यासाठी ब्लू इन्फिनिटी आणि आयआयएफएल फाऊंडेशनने मदतीचा हात देत लसीचे हे कीट जव्हारच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात सहीसलामत रवाना केले.
कोरोनाला रोखण्यात राज्य सरकार यशस्वी पावले उचलत आहे. शहरी भागात जास्तीत जास्त लसीकरणावर भर दिला जात असतानाच ग्रामीण व आदिवासी भागात लस पोहचविण्यासाठी आरोग्य यंत्रणेचे स्वयंसेवक झटत आहेत. परंतु पालघर जिह्यातील दुर्गम आदिकासी भागातील जक्हार, मोखाडय़ाच्या डोंगराळ वाडय़ावस्त्यात लसीचे डोस जलदपणे पोहोचवण्यासाठी अनेक अडचणी आल्या आहेत. याकर मात करण्यासाठी ड्रोनची मदत घेऊन आता हे डोस या गावापर्यंत पोहोचवण्याची संकल्पना आखली गेली. त्यासाठी आरोग्य विभागाला ब्लू इन्फिनिटी आणि आयआयएफएल फाऊंडेशनच्या मदतीने एक ऍक्शन प्लॅन आखला. त्यानुसार जव्हारमधील राजीव गांधी स्टेडियम येथून झाप गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीचे 300 डोस घेऊन ड्रोन पोहोचले. अवघ्या 9 मिनिटात या लसी घेऊन ड्रोन झाप आरोग्य केंद्राच्या मैदानावर डेरेदाखल झाले. पाच किलो वजन वाहून नेण्याची क्षमता या ड्रोनमध्ये असून एकाच वेळी 25 किलोमीटरचा पल्ला हे ड्रोन गाठू शकणार आहे.
भविष्यात अत्यावश्यक सेवेसाठी वापर करणार
पहिलाच प्रयोग यशस्वी झाल्याने भविष्यात अत्यावश्यक असलेली औषधे, प्रत्यारोपणासाठी लागणारे अवयव, रक्त याची अत्यावश्यकता असल्यास ड्रोनची मदत घेतली जाणार आहे. जव्हार येथे या प्रात्यक्षिक वेळी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, आरोग्य विभागाचे आयुक्त डॉ. रामस्वामी, पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ उपस्थित होते.
तेलंगणा आणि महाराष्ट्रात परवानगी मिळाली. मात्र तेलंगणात केलेल्या प्रयोगात ड्रोनची दोन किलो वजन व पाच किलोमीटर अंतराची क्षमता होती. जव्हारमध्ये 5 ते 7 किलो वजन आणि 25 ते 30 किलोमीटर अंतराची क्षमता असलेला ड्रोन होता. देशातील हा पहिलाच प्रयोग यशस्वी ठरला. झाप येथे पोहोचताच लसीकरणही करण्यात आले.
– डॉ. दयानंद सूर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी
पालघरच्या जव्हार, मोखाडा यासारख्या अतिदुर्गम भागात वेळेत उपचार न मिळाल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. त्यामुळे भविष्यात ड्रोनद्वारे मिळणाऱया सुविधांमुळे आरोग्य विभागाला अनेकांचे जीव वाचवता येतील.
– डॉ. प्रदीप व्यास, प्रधान सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग.



























































