लेख – बूस्टर लसीबाबत कोणते धोरण असावे?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रा. डॉ. गजानन र. एकबोटे

लसीकरण न झालेल्या व्यक्तींमध्ये ओमायक्रोन हा विषाणूचा प्रकार जलदगतीने संक्रमित होतो, परंतु पूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींमध्ये ओमायक्रोनच्या संक्रमणाविषयी अभ्यास चालू आहे. इस्रायलमध्ये बूस्टर डोस दिल्यामुळे ओमायक्रोनच्या संक्रमणास प्रतिबंध झाला आहे. बूस्टर डोस दिलेल्या व्यक्तींमध्ये ओमायक्रोनचे संक्रमण झाल्यास होणारा संसर्ग अतिशय सौम्य स्वरूपाचा असतो, असे तज्ञांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे आपल्या देशात बूस्टर डोसविषयी ताबडतोब धोरणात्मक निर्णय घेणे जरुरीचे आहे.

जेव्हा कोविड लसीद्वारे दिलेले संरक्षण कमी होऊ लागते तेव्हा बूस्टर लस ही रोगप्रतिकारशक्तीची पातळी राखण्यात मदत करू शकते. असे असले तरी संपूर्ण लोकसंख्येला लसीकरण करणे हे अग्रस्थानी आहे. केंद्रीय सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, हिंदुस्थान अद्याप कोविड-19 लसीचे बूस्टर डोस देण्याच्या शक्यतेची तपासणी करत आहे, तर जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) यावर काहीही भूमिका घेतलेली नाही. सध्या दुसरा डोस देण्यास उच्च प्राधान्य आहे, यावर भर देताना तज्ञांनी कोविडपासून सतत संरक्षणासाठी बूस्टर डोसची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे. काहींनी दोन्ही पर्यायांचा एकाच वेळी विचार करण्याचा सल्ला दिला आहे. म्हणजे लसीकरणासाठी व्याप्ती वाढवणे आणि असुरक्षित विभागांना लक्ष्यित बूस्टर डोस देणे.

बहुतेक कोविड लस दोन डोसमध्ये दिल्या जातात. काही एकच डोस म्हणून दिल्या जातात. मूळ डोसद्वारे प्रदान केलेले संरक्षण कालांतराने कमी होण्यास सुरुवात झाल्यानंतर दिलेला बूस्टर हा अतिरिक्त डोस आहे.

सप्टेंबरमध्ये आयसीएमआर – प्रादेशिक वैद्यकीय संशोधन केंद्र, भुवनेश्वर येथे केलेल्या अभ्यासात संपूर्ण लसीकरणानंतर चार महिन्यांत कोविड-19 विरुद्ध प्रतिपिंडांमध्ये लक्षणीय घट दिसून आली आहे.

आणखी एक अभ्यास mRNA लसींच्या रोगप्रतिकारक प्रतिसादावर झाला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला हा अभ्यास ‘सायन्स’मध्ये प्रकाशित झाला. या लसींमुळे सहा महिन्यांत, प्रतिपिंडांची पातळी कमी होत असल्याचे आढळले, परंतु मेमरी ‘बी’ पेशी आणि ‘टी’ पेशी यांचा प्रतिसाद चांगला आढळले. बहुतेक ‘बी’ पेशी अल्फा, बीटा आणि डेल्टा प्रकारांना प्रतिकार करण्यास सक्षम होत्या. अमेरिकेमधील एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, फायझर-बायोटेक या mRNA लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर सहा महिन्यांनी प्रतिपिंडे 80 टक्क्यांहूनही कमी होतात.

बूस्टर डोसच्या परिणामावर केलेला अभ्यास – बायोएनटेक आणि फायझरने असे म्हटले आहे की, तीन-डोसचा कोर्स प्रयोगशाळेच्या चाचणीमध्ये ओमायक्रॉन प्रकाराला प्रतिकार करण्यास सक्षम आहे. तिसऱया डोसमुळे 25 च्या पटींनी ही प्रतिकार करण्याची प्रतिपिंडे वाढली.

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या शास्त्र्ाज्ञांनी नुकत्याच केलेल्या अभ्यासात विषाणूच्या नवनवीन रूपांशी लढण्यासाठी कोव्हिशिल्डचे बूस्टर डोस वापरण्याचे सुचवले आहे. BioR²iv वर पोस्ट केलेल्या आणि अद्याप समवयस्क-पुनरावलोकन करणे बाकी असलेल्या अभ्यासामध्ये, ज्यांना कोविशील्डचे दोन डोस मिळाले त्यांच्या रक्ताच्या नमुन्यांमधील प्रतिकार क्षमतेचे मूल्यांकन केले गेले.

डेल्टा विषाणूचे संक्रमण विषाणूंच्या उच्च भारांशी (हाय व्हायरल लोडस्) संबंधित आहे. सामुदायिक प्रसार जास्त असल्यास विषाणूचा प्रसार नियंत्रित करण्यास बूस्टर डोस मदत करतील असे कोविड-19 वरील संशोधनात आयसीएमआरने नमूद केले आहे. असेही नमूद केले की, बूस्टर डोस घेणाऱया व्यक्तींची संख्या वाढल्यावर इस्रायलमध्ये दैनंदिन कोविडच्या प्रकरणांची संख्या कमी झाली आहे.

हिंदुस्थानात जिथे वेगवेगळ्या लसींचा अतिरिक्त साठा उपलब्ध नाही, तेथे लसीकरण आक्रमकपणे वाढवायचे की नाही? किमान सहा महिन्यांपूर्वी लसीकरण झालेल्यांना, विशेषतः ज्यांना आधीपासून इतर आजार आहेत आणि आरोग्य कर्मचारी यांना बूस्टर डोस देता येतील का यासंदर्भात तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे.

काही तज्ञांनी सांगितले की, विशेषतः कोविडचा उद्रेक झालेल्या क्षेत्रात बूस्टर डोस हे उत्तर नाही. कोणत्याही समुदायामध्ये, विशिष्ट रोगांसाठी मोठय़ा प्रमाणात लसीकरण हे प्रसार रोखण्याचा एक मजबूत मार्ग प्रदान करते. शिफारस केलेल्या डोसच्या संख्येसह संपूर्ण पात्र लोकसंख्येचे लसीकरण होणे हे ध्येय असले पाहिजे यावर तज्ञांनी जोर दिला आहे.

इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. जे. ए. जयलाल यांनी केंद्राने आरोग्य सेवा कर्मचारी आणि रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्तींसाठी एक बूस्टर डोस देण्याची गरज व्यक्त केली आहे. “सामान्य संसर्गाचा सामना करण्यासाठी प्रतिकारशक्ती पुरेशी आहे. आता ओमायक्रॉन या दुसऱया प्रकारामध्ये उच्च संक्रमण क्षमता दर्शविणारे अहवाल आहेत. अशा परिस्थितीत जे आरोग्य सेवा कर्मचारी असतील त्यांना संसर्गाच्या वाढत्या वारंवारतेमुळे सर्वाधिक धोका असेल. तरीही प्रथम देशातील सर्व लोकांचे लसीकरण लवकर पूर्ण केले पाहिजे’’ असे ते म्हणाले.

बूस्टर व्यवस्थापित करण्यामध्ये काही देशांचा तर्क – यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनने (CDC) फायझर-बायोटेक किंवा मॉडर्ना लस घेतलेल्या सर्व प्रौढ लोकांसाठी त्यांच्या दुसऱया डोसनंतर किमान सहा महिन्यांनी बूस्टर डोसची शिफारस केली आहे. युरोपियन CDC ने नागरिकांना पूर्ण लसीकरण करून घेण्याचे आणि बूस्टर लसीकरणावरील शिफारसींचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

अनेक युरोपियन देशांमध्ये जेथे लसीकरण जवळ जवळ एक वर्षापूर्वी सुरू झाले होते, तेथे साथीच्या रोगात वाढ झाली आहे. लसींचा साठा असलेल्या या देशांनी आणि अमेरिकेने गेल्या अनेक महिन्यांपासून बूस्टर डोसचे धोरण अवलंबले आहे.
याशिवाय, काही प्राथमिक पुरावे आहेत की mRNA लसींद्वारे (जसे की, Pfizer-BioNTech आणि Moderna कडून) तयार झालेली प्रतिकारशक्ती, एडेनोव्हायरस-व्हेक्टर-आधारित लसींद्वारे (जसे की, कोव्हिशिल्ड) तयार झालेल्या प्रतिकारशक्तीपेक्षा लवकर कमी होते, विशेषतः टी पेशी प्रतिसादासाठी. गेल्या महिन्यात ‘न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन’मध्ये प्रकाशित झालेल्या एका पत्रात याची चर्चा झाली होती. “म्हणूनच mRNA लस प्राप्तकर्त्यांना हिंदुस्थानींपेक्षा लवकर बूस्टरची गरज भासू शकते. हिंदुस्थानातील 80 टक्यांपेक्ष जास्त लस प्राप्तकर्त्यांना कोव्हिशिल्ड मिळाले आहे हे ध्यानात घेतले आहे.

बूस्टर डोस देण्यासाठी सर्वात जास्त गरज असलेल्या गटांना लक्ष्य केले पाहिजे (उदा. आरोग्य कर्मचारी आणि जास्त जोखीम असेलेले रुग्ण). बूस्टर लसीकरणापेक्षा प्राथमिक लसीकरण सुधारण्यास प्राधान्य दिले पाहिजे, असे सर्वच तज्ञांचे मत आहे.

बूस्टर डोसबाबत हिंदुस्थानचे धोरण

केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, दोन तज्ञ संस्था अद्याप याची तपासणी करत आहेत. डब्ल्यूएचओबद्दल हिंदुस्थानच्या कोविड -19 टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. व्ही. के. पॉल यांनी नमूद केलेः “त्यांच्याकडे बूस्टरच्या प्रशासनाबद्दल पूर्ण स्पष्टता आहे. त्यावर विचार सुरू आहे. यात सर्वात महत्त्वाची प्राथमिकता म्हणून प्राथमिक लसीकरण पूर्ण करण्याची गरज स्पष्टपणे आणि जोरदारपणे अधोरेखित केली आहे. प्रौढांना दोन डोस देऊन लसीकरण करण्याचे कार्य पूर्ण करण्याबाबत आमचे धोरण आणि एकूण जागतिक पातळीवरील चित्रदेखील आमच्या वरील दृष्टिकोनाशी जुळलेले आहे. त्याचप्रमाणे हिंदुस्थानमध्ये पूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींपैकी 80 टक्के व्यक्तींना कोव्हिशिल्ड हे लस मिळाली आहे. कोव्हिशिल्डमुळे प्रतिकारशक्ती चांगल्या प्रकारे निर्माण होते हे तज्ञांनी सिद्ध केले आहे. हिंदुस्थान अजूनही बूस्टर डोसच्या मुद्दय़ाचे परीक्षण करत आहे. अँटिबॉडी (प्रतिपिंडे) प्रतिसादावरील माहितीने असे दाखवून दिले आहे की, नऊ महिने ते एक वर्षानंतरही लस प्रभावी आहेत. हे लसींच्या प्रकारावर अवलंबून असते. हिंदुस्थानात ओमायक्रॉन विषाणूविरुद्ध कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसी कितपत परिणामकारक आहेत, याचा अभ्यास चालू आहे.

लसीकरण न झालेल्या व्यक्तींमध्ये ओमायक्रोन हा विषाणूचा प्रकार जलदगतीने संक्रमित होतो, परंतु पूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींमध्ये ओमायक्रोनच्या संक्रमणाविषयी अभ्यास चालू आहे. इस्रायलमध्ये बूस्टर डोस दिल्यामुळे ओमायक्रोनच्या संक्रमणास प्रतिबंध झाला आहे. बूस्टर डोस दिलेल्या व्यक्तींमध्ये ओमायक्रोनचे संक्रमण झाल्यास होणारा संसर्ग अतिशय सौम्य स्वरूपाचा असतो, असे तज्ञांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे आपल्या देशात बूस्टर डोसविषयी ताबडतोब धोरणात्मक निर्णय घेणे जरुरीचे आहे.