
कोरोना… डेल्टा… ओमायक्रोन… ही साखळी यापुढेही अशी वाढत जाणार आहे. कोरोनाचे कुटुंब आणखी विस्तारणार आहे. आता ओमायक्रोनचा भाऊ सापडला आहे. त्याचे नाव आहे डेलमायक्रोन. सध्या जे रुग्ण सापडत आहेत ते डेलमायक्रोनचे आहेत. या डेलमायक्रोनने जगाला हैराण करून सोडले आहे. आधीच कोरोनाला वैतागलेले लोक कोरोना कुटुंबात हे आणखी एक नामकरण झाल्याने घाबरलेही आहेत आणि चेष्टाही करू लागले आहेत. कोरोनाचे कुटुंब असेच वाढत राहणार आहे, पण त्यांच्यामुळे आपल्या कुटुंबाचा गाडा अडकून राहू नये अशीच सर्वांची इच्छा आहे.
डेलमायक्रोन म्हणजे नक्की काय आहे असे राज्याच्या टास्क फोर्समधील तज्ञ डॉ. शशांक जोशी यांना विचारले असता तो काही नवा व्हेरिएंट नाही असे त्यांनी स्पष्ट केले. डेलमायक्रोन म्हणजे डेल्टा आणि ओमायक्रोनचा संयुक्त हल्ला आहे. कोरोना थंडावल्यानंतर आता या दोघांनी मोर्चा सांभाळला आहे. दोघांनीही एकत्र हल्ला केल्यामुळेच जगभरात रुग्ण वाढत आहेत. सध्या जे रुग्ण सापडत आहेत ते यापैकी एका व्हेरिएंटने ग्रस्त आहेत. देशात जे रुग्ण सापडत आहेत ते डेल्टाचे आहेत तर बाहेरून जे विमानाने येत आहेत ते ओमायक्रोनचे आहेत, असे डॉ. जोशी यांनी सांगितले.
डेल्टा आणि ओमायक्रोन एकाच वेळी तुटून पडल्याने रुग्णसंख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे, परंतु घाबरण्याचे कारण नाही. ओमायक्रोनचे रुग्ण बरे होत आहेत. फक्त त्याचा संसर्गाचा वेग अधिक असल्याने रुग्णसंख्येत वाढ होत आहे, असे डॉ. जोशी यांनी सांगितले.
कुठलाही ‘क्रोन’ असो, लसीकरण पूर्ण करा!
ओमायक्रोन असो वा डेलमायक्रोन… कुठलाही क्रोन असो, फक्त लसीकरण पूर्ण करा. कुणी लस घेतली नसेल तर आधी तातडीने लस घ्या. कारण कोरोनाच्या कुटुंबाला आवर घालण्याची क्षमता सध्यातरी लसीमध्येच आहे. लस घेतलेल्यांना संसर्ग जरी होत असला तरी लसीमुळे मिळालेल्या रोगप्रतिकारक शक्तीमुळे ते चिंताजनक अवस्थेकडे जाण्यापासून वाचतील असा विश्वासही डॉ. जोशी यांनी व्यक्त केला.
डेल्टा व्हेरिएंटचा प्रभाव हिंदुस्थानात जास्त झाला. तो परदेशात त्या तुलनेत नव्हता. परदेशात डेल्टाची जागा आता ओमायक्रोनने घेतली आहे. आपल्या देशात ओमायक्रोनचा किती प्रभाव पडेल हे सध्यातरी सांगता येत नाही, असे डॉ. जोशी यांनी सांगितले. देशात ओमायक्रोनच्या रुग्णांची संख्या 213 पेक्षा जास्त झाली आहे. त्यात दिल्ली आणि महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. दिल्लीत 57 तर महाराष्ट्रात 54 रुग्ण आढळले. ओमायक्रोनचा वेग पाहून केंद्र सरकारने राज्यांना विशेष काळजी घेण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. दुसरीकडे लसीकरणाचाही वेग वाढवण्यात आला आहे.


























































