
दिल्ली शहरात प्रदूषणावर उपाय शोधण्यासाठी ‘दिल्ली प्रदूषण नियंत्रण मंडळा’ने स्थापन केलेल्या समितीने ‘स्मार्ट टॉवर’चा पथदर्शी प्रकल्प हाती घेतला आहे. दिल्ली येथे सुमारे 11 कोटी रुपये खर्च करून उभारलेले एक ‘स्मॉग टॉवर’पुढील 25 वर्षं हवा शुद्ध करण्याचे काम करणार आहे. या ‘स्मॉग टॉवर’ची देखभाल-दुरुस्तीदेखील फार खर्चिक नाही. दिल्लीच्या धर्तीवर मुंबईसह राज्यातील इतर सर्वाधिक प्रदूषित शहरांत असे ‘स्मॉग टॉवर’ उभारण्यात आले तर तेथील प्रदूषण कमी होण्यासह नागरिकांना शुद्ध हवेत मोकळा श्वास घेणे शक्य होणार आहे. त्यामुळे दिल्लीतील ‘स्मॉग टॉवर’ प्रकल्पाचा अभ्यास करून मुंबईसह राज्यातील सर्वाधिक प्रदूषित शहरात ‘स्मॉग टॉवर’ उभारण्याबाबत शासनाने ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी शिवसेना आमदार विलास पोतनीस यांनी विधान परिषदेत विशेष उल्लेखाच्या माध्यमातून केली.






















































