परशुराम घाटाच्या चौपदरीकरणाचा नारळ फुटला, पोलीस बंदोबस्तात काम सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संपादित जमिनीच्या मोबदल्याच्या मुद्द्यावरून गेली पाच वर्षे सुरु होऊ न शकलेले महामार्गावरील परशुराम घाटाच्या चौपदरीनाचा नारळ अखेर फुटला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार मोठा पोलीस बंदोबस्त घेऊन ठेकेकदाराने गुरुवारपासून चौपदरीकरणाच्या कामाला सुरुवात केली. रखडलेले हे काम सुरू होण्यामागे चिपळूण येथील ऍड ओवेस पेचकर यांनी महत्वाची भूमिका बजावली.

मुंबई गोवा महामार्गावरील अवघड मानल्या जाणाऱ्या परशुराम घाटाच्या चौपदरीकरणाचे काम गेली पाच वर्षे सुरु होऊ शकले नव्हते. चौपदरीकरणासाठी संपादित करण्यात आलेल्या मोबदल्याच्या रकमेवरुन कुळ , खोत आणि देवस्थान कमिटी यांच्यामध्ये वाद निर्माण झाला होता. या वादावर तोडगा काढण्याचा अनेक प्रयत्न झाले मात्र मोबदल्याच्या रकमेवरुन एकमत होत नसल्याने परशुराम घाटाच्या चौपदरीकरणाचे काम सुरु करण्यात आलेले नव्हते.

जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीच्या या घाटातील रस्त्याचा काही भाग वाहून गेला आणि घाट रस्त्याच्या चौपदरीकरणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. दरम्यान चिपळूण येथील ऍड ओवेस पेचकर यांनी उच्च न्यायालयात परशुराम घाटाच्या रखडलेल्या कामाबाबत याचिका दाखल केली. न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका जेव्हा सुनावणीसाठी आली तेव्हा न्यायाधीशांनी परशुराम घाटाचे काम तात्काळ सुरु करण्याचे आदेश दिले. घाटाचे काम सुरु करण्यास कोणी मज्जाव करत असेल तर पोलीस बंदोबस्त घेऊन कामाला सुरुवात करावी आणि अहवाल न्यायालयाला सादर करावा असे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना सूचित केले.

न्यायालयाच्या या आदेशानंतर परशुराम घाट चौपदरीकरण प्रक्रियेला वेग आला आणि चौपदरीकरणाला विरोध करणारे ग्रामस्थ, महामार्ग बांधकाम विभागाचे अधिकारी पोलीस प्रशासन, यांची चिपळूणचे प्रांताधिकारी प्रवीण पवार यांनी संयुक्त बैठक आयोजित केली. या बैठकीत घाटाचे काम सुरु करण्याला ग्रामस्थांचा विरोध मावळला आणि त्यांनी काम सुरु करण्यास आमची कोणतीही आडकाठी नसल्याचे जाहीर केले.

ग्रामस्थांनी काम करण्यास परवानगी देताना घाटामध्ये कोणत्या नागरी सुविधा गरजेच्या आहेत हे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले होते. त्यानुसार 22 डिसेंबर रोजी ग्रामस्थ आणि महामार्ग बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी घाटाचे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणादरम्यान ग्रामस्थांनी घाटामध्ये ज्या नागरी सुविधा सुचविल्या त्या देण्याचे महामार्ग बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी मान्य केल्या आणि घाटाच्या चौपदरीकरणाचा मार्ग मोकळा झाला.

घाट रस्त्याचे काम सुरु करण्याबाबत करण्यात आलेल्या नियोजनानुसार 23 डिसेंबर रोजी सकाळी घाटाच्या चौपदरीकरचा नारळ फोडण्यात आला आणि युद्धपातळीवर कामाला सुरवात झाली. काम सुरु करताना कोणतीही अडचण होऊ नये यासाठी घाटात 9 अधिकारी आणि 130 पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र घाट चौपदरीकरणाच्या कामाला सुरवातीला विरोध करणारे ग्रामस्थ घाटाकडे फिरकलेच नाहीत त्यामुळे कोणताही अडथळा न येत चौपदरीकरच्या कामाला सुरवात झाली.