
कोंबडी आधी की अंड ? हा बुचकळ्यात टाकणारा प्रश्न अनेकदा विचारला जातो, पण याचे समाधानकारक उत्तर आजपर्यंत कोणाला सापडले असेल असे आतापर्यंत ऐकिवात नव्हते. बऱ्याच वर्षांपासून शास्त्रज्ञही या दोघांपैकी कोणाचा जन्म आधी झाला याचा शोध घेत आहेत, मात्र अखेर शास्त्रज्ञांनी अथक प्रयत्नांनी या प्रश्नांचे उत्तर शोधून काढले आहे.
ब्रिटनमधील शेफील्ड आणि वारविक विश्वविद्यालयातील शास्त्रज्ञांनी कोंबडी आणि अंड्यापैकी आधी कोण जन्माला आले या विषयावर अभ्यास केला. त्यांनी केलेल्या अभ्यासानुसार, लेखक डॉ. कोलिन फ्रीमॅन यांनी सांगितले की, बरीच वर्षे संशोधन करून या प्रश्नाचे उत्तर आम्ही शोधून काढले. अंड्याच्या निर्मितीकरिता ‘ओवोक्लायडिन’ या प्रथिनाची आवश्यकता असते. फलन झाल्यावर हे प्रथिन कोंबडीच्या गर्भाशयात तयार होते. यामुळे कोंबडी आधी आली त्यानंतर तिने अंड्यातून प्रजोत्पत्ती केली, हे स्पष्ट होते.
शास्त्रज्ञांनी या संशोधनाकरिता हायटेक कॉम्प्युटर हेक्टर (एचईसीटीओआर) या तंत्रज्ञानाचा वापर केला. यावेळी त्यांना अंड्याच्या कवचाची (अंड्याचा वरचा भाग) आण्विक रचना समजली. त्यावेळी केलेल्या अभ्यासावेळी त्यांना असे आढळले की, अंड्याच्या कवचासाठी लागणारे प्रथिनं फक्त कोंबडीच तयार करू शकते. तसेच ओव्होक्लायडिन प्रथिनामुळे कॅल्शियम कार्बोनेट अंड्याच्या कवचामध्ये रुपांतरित होते आणि हळूहळू हे कवच घट्ट होते. जेव्हा संपूर्णपणे अंड तयार होते. अशी माहिती शास्त्रज्ञांनी दिली आहे.
पुढे त्यांनी सांगितले की, बऱ्याच जातीच्या कोंबड्या 24 ते 36 तासांत अंड देतात. पहिले अंड दिल्यावर जोपर्यंत ती दुसरं अंड देत नाही तोपर्यंत ती आधीच्या अंड्यावर बसून राहते. कोंबडी आधी आली की अंड या प्रश्नाचे उत्तर सापडले आहे, पण जगात कोंबडी कुठून आली या प्रश्नाचे उत्तरही शास्त्रज्ञ शोधत आहेत, अशी माहिती डॉ. कॉलिन यांनी दिली आहे. जगभरातील अनेक शास्त्रज्ञ कोंबडीच्या निर्मितीचे उत्तर शोधण्यात गुंतले आहेत त्यांचे म्हणणे आहे.


























































