पांढऱया गणवेशात इंग्लंड टीम पुरती बेरंग, तिसऱया ऍशेस कसोटीत 1 डाव 14 धावांनी पराभव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगाला क्रिकेट शिकवणाऱया इंग्लंड संघावर यंदाच्या ऍशेस कसोटी मालिकेत झटपट कसोटी गमावत 0-3 अशी लाजिरवाणी कामगिरी नोंदवण्याची नामुष्की आली आहे. मेलबर्नच्या तिसऱया लढतीत पाहुण्या इंग्लंडचा दुसरा डाव आज 27.4 षटकांतच 68 धावांवर कोसळला. त्यामुळे यजमान ऑस्ट्रेलियन संघाने तिसऱया कसोटीत 1 डाव आणि 14 धावांनी विजय मिळवत ऍशेस मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. कांगारूंचा प्रमुख वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड जायबंदी असताना 32 व्या वर्षी कसोटी पदार्पण करणाऱया स्कॉट बोलँडने तुफानी वेगवान मारा करीत इंग्लंडच्या 6 फलंदाजांना केवळ 4 षटकांत फक्त 7 धावांत तंबूत परतवले. या लढतीत 55 धावांत 7 विकेट घेणाऱया बोलँडला ‘मॅन ऑफ दि मॅच’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

आदिवासी क्रिकेटरने कांगारूंना विजयी केले

मूळचा मेलबर्न निवासी असलेला 32 वर्षीय स्कॉट बोलँड हा ऑस्ट्रेलियन कसोटी संघात पदार्पण करणारा चौथा आदिवासी क्रिकेटपटू ठरला आहे. याआधी जेसन गिलेस्पी हा वेगवान गोलंदाज ऑस्ट्रेलियन संघात होता. तोही आदिवासी वंशाचा क्रिकेटपटू होता. बोलँडने 32 व्या वर्षी कसोटी पदार्पण करीत लढतीत 7 विकेट घेण्याचा आगळा पराक्रमही आपल्या नावावर केला आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये चमक दाखवणाऱया बोलँडला आपल्या कसोटी पदार्पणासाठी चक्क 5 वर्षे प्रतीक्षा करावी लागली आहे. आज तिसऱया कसोटीत त्याने भन्नाट वेगवान मारा करीत 4 षटकांतच इंग्लंडच्या 6 फलंदाजांना केवळ 7 धावांतच तंबूत धाडण्याचा पराक्रम साकारला. त्याच्या या पराक्रमामुळे तो लढतीचा ‘सामनावीर’ ठरला.

ऍशेस कसोटी मालिकेच्या इतिहासात केवळ 12 दिवसांतच ही मालिका गमावण्याची वेळ यंदा इंग्लंडवर आली आहे. यजमान ऑस्ट्रेलियन संघाने इंग्लंड संघाला कसोटींत पुरते बेरंग करून झटपट ऍशेस मालिका जिंकण्याचा भीमपराक्रम यंदा केला आहे. इंग्लंडवर मात्र एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक 9 लढती गमावण्याची नामुष्की या मालिकेत आली आहे. यापूर्वी 2003 मध्ये वर्षातील सर्वाधिक 9 लढती गमावण्याचा खराब विक्रम बांगलादेशच्या नावावर होता. इंग्लंड संघाची ही आजवरच्या ऍशेस कसोटी मालिकेतील सर्वात लाजिरवाणी कामगिरी मनाली जात आहे. एका कॅलेंडर वर्षांत सर्वाधिक लढती गमावण्याचा खराब विक्रम इंग्लंडच्या वाटय़ाला आला आहे.

संक्षिप्त धावफलक
इंग्लंड ः पहिला डाव – सर्व बाद 185, दुसरा डाव – 27.4 षटकांत सर्वबाद 68 (जो रूट 28, बेन स्टोक्स 11; मिचेल स्टार्क 10- 3 – 29- 3, स्कॉट बोलँड 4 -1 -7 -6).
ऑस्ट्रेलिया – पहिला डाव – 87.5 षटकांत सर्वबाद 267 (मार्क्स हॅरिस 76, डेव्हिड वॉर्नर 38, ट्रेव्हिस हेड 27, पॅट कमिन्स 21, मिचेल स्टार्क नाबाद 24; जेम्स ऍण्डरसन 23-10-33-4, रॉबिन्सन 19.2- 4 64 -2, मार्क वूड 19.5-2-71-2).