कोरोनाला घाला गोळी! ‘मोलनुपिरावीर’ टॅब्लेटला मंजुरी, आणखी दोन लसीही येणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाला रोखण्यासाठी देशात लसीकरणाचा वेग वाढविण्याकरिता आणखी दोन लसींना मंजुरी देण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे ‘मोलनुपिरावीर’ ही टॅब्लेटही वापरण्यास मान्यता देण्यात आली.

देशभरात कोरोनाबरोबरच नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनची रुग्णसंख्या वाढत असतानाच लसीकरणाला वेग देणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने पाऊले उचलली जात असून, नवीन वर्षाच्या सुरुवातीला 1 जानेवारीपासून 15 ते 18 वर्षांच्या मुलांचे लसीकरण आणि 10 जानेवारीपासून फ्रंटलाईन वर्कर्स व 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना तिसरा प्रिकॉशन डोस देण्यात येणार आहे. आता आणखी दोन लसीला मान्यता देताना कोरोनाला रोखण्यासाठी गोळीही आली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी टिव्टद्वारे माहिती दिली.

देशात सध्या कोरोना प्रतिबंधक सहा लसींचा वापर होतो. ‘सीरम’ची कोव्हीशिल्ड, भारत बायोटकची कोवॅक्सिन, झायडस कॅडीलाची झायको-डी, राशियाची स्फूटनिक-व्ही आणि अमेरिकेच्या मॉडर्ना व जॉन्सन ऍण्ड जॉन्सन.
आज कोवोवॅक्स आणि कॉर्बेवॅक्स या दोन लसींना आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली आहे. कोवोवॅक्स लसीचे उत्पादन पुण्यातील ‘सीरम इन्स्टीटय़ूट ऑफ इंडिया’ येथे होणार आहे. कॉर्बेवॅक्स लसीचे उत्पादन हैदराबाद येथील बायोलॉजिकल-ई कंपनी करणार आहे.
मोलनुपिरावीर (Molnupiravir) हे ऍण्टी व्हायरस ड्रग आहे. 13 देशांमध्ये या गोळीचे उत्पादन होत आहे. सहव्याधी असलेल्या प्रौढ रुग्णाला ही गोळी देण्यात येते. हिंदुस्थानात सिपला कंपनीकडून Cipmolnu या नावाने टॅब्लेटचे उत्पादन कॅप्सुल रुपात होणार आहे.