नीतेश राणे यांच्या जामिनावर आज निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाविकास आघाडीचे प्रचारप्रमुख संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आमदार नीतेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी मंगळवारी पूर्ण झाली आहे. संशयितांचे वकील आणि सरकारी वकिलांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यावर न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला आहे. यावर गुरुवारी जिल्हा व सत्र न्यायालय निर्णय देणार आहे.

जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचारक संतोष परब यांच्यावर हल्ला झाला होता. याप्रकरणी आतापर्यंत एकूण सहा संशयितांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये स्वाभिमानचा पुणे येथील कार्यकर्ता सचिन सातपुते याला अटक केल्यानंतर पोलिसांची चव्रे नीतेश राणे व संदेश सावंत यांच्या दिशेने फिरली होती. त्यामुळे या दोघांनी 27 डिसेंबर रोजी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. यावर आज जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही. हांडे यांच्या न्यायालयात सुनावणी घेण्यात आली.

यावेळी सरकारी पक्षाच्या वतीने वकील प्रदीप घरत, भूषण साळवी, गजानन तोडकर हे उपस्थित होते. तर नीतेश राणे, संदेश सावंत यांच्या वतीने वकील संग्राम देसाई, राजेंद्र रावराणे, उमेश सावंत यांच्यासह सहा वकिलांची फौज न्यायालयात होती.

सरकारी वकील घरत यांनी केलेल्या युक्तिवादात नीतेश राणे, गोटय़ा सावंत यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला जावा यासाठी जोरदार प्रयत्न केले. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर जिल्हा प्रधान सत्र न्यायाधीश हांडे यांनी याबाबत 30 डिसेंबर रोजी निकाल देणार असल्याचे सांगितले.

नवीन संशयित आरोपीचे सातपुते याच्याशी कॉल कनेक्शन

बुधवारी अडीच तास युक्तिवाद झाला असताना आज 1 वाजता सुनावणीला सुरुवात झाली. यानंतर दुपारच्या ब्रेकनंतर सुमारे तीन तासांहून अधिक काळ दोन्ही बाजूंनी युक्तिवाद झाला. यात आणखी नवीन संशयित आरोपी आढळून आले असल्याने आणि त्यांचे कॉल रेकॉर्ड संशयित सातपुते याच्याशी मिळत असल्याचे पुरावे पोलिसांनी सादर केले. यावेळी राणेंचे वकील आणि सरकारी वकिलांमध्ये खडाजंगीही झाली.