
>>मंगला गोगटे
हे तर आता निश्चित आहे की फॅशन उद्योग, एअरलाइन आणि शिपिंग यांच्या एकत्रित कार्बन उत्सर्जनापेक्षा जास्त कार्बन उत्सर्जन करतो. यामुळे परवडणारे व अधिक टिकाऊ कपडे मिळणे शक्य आहे का, याचा शोध घेण्याची गरज आहे.
गेल्या वर्षीच्या ग्राहक किंमत निर्देशांकानुसार कपडय़ांच्या किमती एका दशकात सर्वात कमी झाल्या आहेत. सुमारे 2010 पासून ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर अनेक किरकोळ विक्रेत्यांच्या स्पर्धा करण्यामुळे हे घडले आहे. शिवाय असे झाले की फारसा वेळ घालवायला न लागता व अनेकदा प्रवास खर्च न करता घरबसल्याही स्वस्त कपडे खरेदी शक्य झाले. लोक खूश झाले. फॅशन सुरू होते न होते तोच खरेदी करून ते कपडे वापरणे शक्य झाले. परंतु वेगवान फॅशनसाठी किंमत मोजावी लागते.
अगदी पूर्वी तयार कपडे बरेच महाग असत. कारण त्याकाळात ते शिवून घेणे स्वस्त होते. आता तयार कपडय़ांच्या उत्पादनाचे प्रमाण वाढल्याने दर कपडय़ागणिक उत्पादन खर्च कमी झाला. परिणामी तयार कपडे स्वस्त झाले. हे स्वस्त होण्यासाठी व्यापारी आधी लहान बॅचेसमधे कपडे बनवतात व ते नमुने बाजारात आणतात. मग त्यापैकी जे डिझाईन जास्त खपेल ते मोठय़ा प्रमाणावर बनवून बाजारात आणले जाते. हल्लीच्या काळात हे सगळं अतिशय वेगाने केले जाते. पूर्वी संकल्पनेपासून विक्रीपर्यंत दोन आठवडे वा त्यापेक्षा कमी वेळ लागत असे. आता तर फक्त 24 तास लागतात म्हणे या सगळ्याला. कारण या फॅशन कंपन्यांचे स्वतःचीच कपडे रंगवण्याची, डिझाईन्स बनवायची इ. कंपनी असते. मग काय फॅशन इतकी वेगवान झाली आहे की तिला ‘अल्ट्रा–फास्ट’ फॅशन म्हणतात. म्हणून तर कधी कधी आपल्याला कळे कळे पर्यंत फॅशन येते आणि जाते सुद्धा. दरवर्षी 8000 लाख कपडे बनतात आणि ई-कॉमर्सवर विकायला येतात. शेवटी ब्रिटनमधे दरवर्षी तीन लाख टन कपडे जमिनीच्या भरावात जातात.
हे कच्च्या मालासाठी कृषी व पेट्रोकेमिकल्स उद्योगांपासून सुरू होते. तंतूंचे फॅब्रिक आणि शेवटी कपडय़ामधे रूपांतर होण्यासाठी ते उत्पादन उद्योगात पाठवले जाते. हा फॅशन उद्योग पॅकेजिंग आणि लॉजिस्टिक उद्योगालाही स्पर्श करतो आणि शेवटी किरकोळ उद्योगाकडे वळतो. शेवटी किमती कमी असल्याने जास्त मागणी आणि जास्त उत्पादन होते, हे सत्य आहे. अनेकदा कपडे आणखी स्वस्त करण्यासाठी नायलॉन व ऍक्रेलिकसारखे कृत्रिम तंतू वापरले जातात. परंतु त्यामुळे ‘कार्बन फूटप्रिंट’मध्ये वाढ होते. कारण तंतू काढण्याची प्रक्रिया खूप ऊर्जाकेंद्रित आहे. अधिक टिकाऊ पर्यायांमध्ये सुती आणि टेन्सेल ही कापड येतात. सुती कापड तर सगळ्यांना माहीत आहे. टेन्सेल, लाकडाच्या, विशेषतः निलगिरीच्या झाडांपासूनच्या, लगद्यापासून बनतं. ताग व बांबूसारखे पर्यायदेखील नैसर्गिकपणे नाश होणारे (biodegradable) आहेत.
सगळे टिकाऊ कपडे पर्यावरणासाठी चांगले नसतात. म्हणजे पुनर्नवीनीकरण वापरलेल्या प्लॅस्टिक आणि पॉलिथिलीन बाटल्यांपासून बनवले जाते. परंतु ते बायोडिग्रेडेबल नसते. तसेच सेंद्रिय कापसापासून बनवलेला सुती टी-शर्ट तयार करण्यासाठी, पारंपरिक टी-शर्ट बनवण्याएवढेच म्हणजे 2700 लिटर पाणी लागते. अडीच वर्षांत एका माणसाला यापेक्षा कमी पाणी पिण्यासाठी लागते. त्यांच्या उत्पादन पद्धतीमुळे टिकाऊ कपडे महाग असतात. त्यामुळे ते कमी संख्येने बनवले जातात.
जे लोक स्वस्त कपडे विकत घेतात ते काही थोडय़ा दिवसांतच ते कपडे टाकून देतात. खूप वेळा असे कपडे निर्यात केले जातात. हे पुनर्वापरापेक्षा चांगले आह. कारण पुनर्वापर बराच वेळ खाते व ते कामगार केंद्रित असते. आजकाल सेकंडहॅण्ड कपडय़ांच्या निर्यातीवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. बंधनांमुळे हे टाकून दिलेले कपडे अनेकदा जाळून टाकले जातात. 2018 पासूनच्या निर्यात निर्बंधांमुळे सिंगापूरच्या ‘सेकंड हॅण्ड’ कपडय़ांच्या निर्यातीत 20 टक्के घट झाली आहे. 2019 मध्ये इथेच तयार झालेल्या 1,68,000 टन कापडाचा केवळ 4 टक्के पुनर्वापरासाठी कामी आला. बाकी सारा कचरा म्हणून जाळून टाकण्यात आला. यानेही पर्यावरणाला हानी पोचते. अनेक विकसित देशांमधून खूपसे वापरलेले कपडे नायजेरिया, दक्षिण आफ्रिका, मलेशिया, थायलंड अशा देशांमध्ये पुनः विक्रीसाठी निर्यात केले जातात.
एकंदरीत जगभरातील लोक फॅशनचे भुकेले आहेत. असे म्हणतात की 2050 पर्यंत कपडय़ांची मागणी तिप्पट होईल. या सगळ्यावर एकच उपाय. ‘कॅप्सूल वॉर्डरोब’ !!! ज्याचा अर्थ होतो “ कमी म्हणजेच जास्त.’’ अर्थः शक्य तितके कमी कपडे वापरा.
– [email protected]




























































