Health Tips – सर्दी, खोकल्यामुळे रात्री झोप येत नाही, ‘या’ सोप्या टिप्सचा वापर करा  

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

थंडीत सर्दी आणि खोकल्याचे विकार बळावतात. अशावेळी नाक बंद होणे, श्वास घेताना त्रास होणे, स्नायूदुखी, छातीत जडपणा येणे, झोपायला गेल्यावर वारंवार खोकल्याची उबळ येणे असे त्रास होतात. त्यामुळे रात्रीच्या वेळी शांत झोप लागत नाही. खरे तर आजारी शरीराला विश्रांतीची आणि शांत झोपेची अत्यंत आवश्यकता असते. पुरेशी झोप न मिळाल्याने आरोग्य बिघडू शकते. सर्दी, खोकल्याचा आजार झालेला असताना रात्रीच्या वेळी शांत झोप लागण्याकरिता काय करायला हवे ? याविषयी माहिती असणे गरजेचे आहे. काही सोप्या टिप्स आचरणात आणल्यास सर्दी-खोकल्यापासून आराम मिळेलच शिवाय शांत झोप लागायलाही मदत होईल.

ह्युमिडिफायरचा वापर करा
सर्दी आणि खोकल्यामुळे नाक बंद झाल्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो. वातावरणातल्या कोरड्या हवेचा जास्तच त्रास होतो. याकरिता खोलीतील आर्द्रता टिकून राहावी यासाठी ह्युमिडिफायर वापरू शकता. ह्युमिडिफायरमध्ये नेहमी शुद्ध पाणीच वापरा.

झोपण्यापूर्वी वाफ घ्या
झोपण्यापूर्वी वाफ अवश्य घ्या. याकरिता वेपोरायझर (वाफेचं भांड) वापरा किंवा पातेल्यात पाणी उकळवून उकळलेल्या पाण्याची वाफ घ्या. यामुळे बंद झालेले नाक उघडून श्वास मोकळा व्हायला मदत होईल. शांत झोप लागून आराम मिळेल.

कोमट पाण्याने गुळण्या करा
सर्दी-खोकला झाल्यावर झोपण्यापूर्वी कोमट पाण्याने गुळण्या करणे गरजेचे आहे. यासाठी पाण्यात मीठ-हळदीचाही वापर करू शकता. असे केल्याने घसा दुखणे, खवखवणे असे त्रास कमी होतील आणि रात्री चांगली झोप लागेल.

नोजल स्ट्रिप्स वापरा
रात्री झोपतेवेळी नोजल स्ट्रिप्सही वापरू शकता. नाक बंद झाल्यामुळे श्वास घेताना होणारा त्रास नोजल स्ट्रिप्स वापरल्यामुळे होणार नाही. नाक मोकळे झाल्यामुळे शांत झोप लागेल.