
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना केंद्र सरकारने मुदतवाढ नाकारल्याने त्यांची महसूल गुप्तवार्ता संचालनालयात (डीआरआय) बदली करण्यात आली आहे. वानखेडे लवकरच डीआरआयमध्ये रुजू होणार आहेत. दरम्यान, वानखेडे यांच्यानंतर एनसीबीचे नवे झोनल डायरेक्टर कोण, यावर दिल्लीत चर्चा सुरू झाली आहे.
समीर वानखेडे हे 2008 बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. वानखेडे हे विमानतळावर हवाई गुप्तचर विभागात कार्यरत असताना त्यांनी सोने तस्करांना गजाआड केले होते. त्याचप्रमाणे बॉलीवूडमधील अभिनेत्याच्या घरी छापेदेखील मारले होते. हवाई गुप्तचर विभागात काम केल्यानंतर वानखेडे यांनी राष्ट्रीय तपास पथक (एनआयए) मध्येदेखील काम केले. तेथे त्यांनी बनावट नोटांची तस्करी करणाऱ्यांवर कारवाई केली होती. एनआयएनंतर वानखेडे यांनी डीआरआयमध्ये काम केले. आंध्र प्रदेश येथून येणारा गांजा मोठय़ा प्रमाणात पकडला होता. दोन वर्षांपूर्वी सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआय करत होती. त्याचदरम्यान केंद्रीय गृह मंत्रालयाने वानखेडे यांना बढती देत एनसीबीचे झोनल डायरेक्टर केले. ऑक्टोबर महिन्यात वानखेडे यांच्या पथकाने कॉड्रीला क्रुझवरील कारवाई करून आर्यन खानसह आठ जणांना अटक केली. या कारवाईवरून मोठा वाद निर्माण झाला होता.
बदलीचा निर्णय योग्यच – नवाब मलिक
समीर वानखेडे यांच्या कार्यकाळात ज्या प्रकारे फर्जिवाडा झाला त्यातली काही प्रकरणे मी लोकांसमोर आणली. त्याबाबत लेखी तक्रारदेखील केली. मी वानखेडे यांना मुदतवाढ देण्यात येऊ नये, अशी मागणी केली होती. अखेर केंद्र सरकारने त्यांना मुदतवाढ न देता बदली केली. हा निर्णय योग्यच आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री नवाब मलिक यांनी दिली.





























































