
मुंबईत कोरोना रुग्णवाढ कायम असून आज सलग तिसऱया दिवशी 24 तासांतील विक्रमी रुग्णनोंद झाली आहे. मुंबईत एकाच दिवसात तब्बल 20 हजार 971 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत, तर सहा जणांचा मृत्यूही झाला आहे.
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून होणाऱया रुग्णवाढीमुळे टेन्शन निर्माण झाले आहे. सर्वाधिक वेगाने पसरणाऱया ओमायक्रोन व्हेरिएंटमुळेच ही रुग्णवाढ होत असल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. रुग्णवाढ होत असल्यामुळे मुंबईत एकूण रुग्णांची संख्या 874780 झाली आहे. सहा मृत्यूंमुळे एकूण मृतांचा आकडा 16394 झाली आहे. रुग्णसंख्या वाढीमुळे रुग्ण दुपटीचा वेगही 56 दिवसांवर आला आहे, तर बरे होण्याचा दर 87 टक्क्यांवर खाली आला आहे. आजच्या बाधितांमधील 1395 जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे, तर 88 जणांना ऑक्सिजन बेडवर दाखल करावे लागले आहे.
धारावीत कोरोनाचे 150 रुग्ण
धारावीत आज दिवसभरात 150 रुग्ण सापडले. धारावीत गुरुवारी 107 रुग्ण सापडले होते. सक्रिय रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली असून 444 वरूही ही संख्या 588 वर पोहोचली आहे. दादर आणि माहीममध्येही रुग्ण वाढले आहेत. दादरमध्ये आज 250 तर माहीममध्ये 370 रुग्ण सापडले. दादरमध्ये 1281 तर माहीममध्ये 1616 सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी दादरमधील 321 तर माहीममधील 404 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
374 डॉक्टरांना कोरोना
राज्यात गेल्या काही दिवसांत 374 डॉक्टरांना कोरोना झाला आहे. केईएममधील 87, शीवमधील 98, जे.जे.मधील 92, नायरमधील 45 डॉक्टरांचा यामध्ये समावेश आहे.
एकाच दिवसात आठ हजार कोरोनामुक्त
रुग्णसंख्या वाढत असली तरी आजपासून पुन्हा एकदा कोरोनामुक्त होणाऱयांची संख्याही वाढू लागल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. आज एकाच दिवसात 8 हजार 490 जणांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त होणाऱयांची संख्या 764053 झाली आहे.
तीन दिवस रेकॉर्डब्रेक
- 5 जानेवारी – 15 हजार 166
- 6 जानेवारी – 20 हजार 181
- 7 जानेवारी – 20 हजार 971



























































