
दिव्या नेरुरकर-सौदागर
आपण साचेबद्धता आणि आदर्शवादाच्या विचारधारेत कधी ना कधी अडकतो. ही विचारधारा आपल्याला योग्य-अयोग्य, चांगला-वाईट, चूक-बरोबर या अशा ‘कडक’ आणि ‘पक्षपाती’ (Biased) संकल्पनेत अडकवून टाकते. आपल्याला काहीसं Rigid (आपल्याच मतावर ठाम) बनवते. यातून बाहेर पडून मन:स्वास्थ्य टिकवायचं असेल तर ‘स्वतःला स्वतःच्या गुणदोषांसकट स्वीकारणं’ गरजेचं आहे. जेव्हा असं आपण करू तेव्हाच आपण आपल्या चुकांबद्दल स्वतःला कमी कठोर होऊन माफ करत जाऊ. एकदा हे आपण जमवलं तरच आपले चांगले गुण मोकळेपणाने स्वीकारून त्यांना खुल्या दिलाने शाबासकीही देऊ शकू.
आपल्या सर्वांच्या जडणघडणीत आईवडिलांचा महत्त्वाचा वाटा असतो. त्यांनी आपल्यावर केलेले संस्कार हे आपल्याला आयुष्यात मार्ग दाखवत असतात. आपलं वागणं, बोलणं, राहणं आणि विचार करणं या सर्वांवर त्यांचा प्रभाव असतो आणि त्यातूनच आपली पुढील वाटचाल ही बहुतांशी ठरत असते.
महेशचं (नाव बदलले आहे) सुद्धा असंच काहीसं होतं. त्याच्या आयुष्यात त्याच्या आई-वडिलांचं स्थान हे त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं होतं. त्यांनी महेशला दिलेल्या संस्कारांतून आणि शिकवणुकीतूनच तो आतापर्यंत वागण्याचा प्रयत्न करत आला होता.
महेश हा तिशीचा होतकरू तरुण होता आणि संगीत क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करीत होता. त्याच्या अथक प्रयत्नांनी त्याला तशा संधीही मिळत होत्या आणि तो या क्षेत्रात आपले पाय घट्ट रोवत होता. महेशच्या कुटुंबाविषयी म्हणायचे झाले तर तो त्याच्या पत्नीसह सुखासमाधानाने राहत होता. पत्नीही त्याला अनुरूप होती. थोडक्यात काय तर महेशचं व्यावसायिक आणि कौटुंबिक जीवन तसं बघायला गेलं तर सुरळीत सुरू होतं. पण तरीही महेश हा स्वतःच्या टीम आणि बॉसबरोबर खूश नव्हता. याचे कारण त्याच्या मते त्याला त्याच्या कामाचे क्रेडिट मिळत नव्हते आणि दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे त्याला त्याच्या नोकरीच्या ठिकाणी कुणालाही ‘नाही’ म्हणणे जमत नव्हते. या दोन महत्त्वाच्या कारणांमुळे त्याची चिडचिड होत होती. कामामध्ये लहानसहान चुका होत होत्या.
महेश काम करत असलेले क्षेत्र हे शेवटी मनोरंजन क्षेत्र होते, जिथे नाही म्हटलं तरी ‘शो ऑफ’ बिझनेस होताच, पण मुळातच मध्यमवर्गीय आणि साध्या वातावरणात राहणाऱ्या महेशला या काही गोष्टी जमतच नव्हत्या. स्पष्ट सांगायचं झालं तर त्याला स्वतःला या गोष्टी पटत नसल्यामुळे त्याला त्या करायच्याच नव्हत्या. ‘हल्ली मला या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागलाय. प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर मी मेहनत करतो, पण बहुतेक वेळा ही गाढव मेहनत होते असं मला वाटतं. कारण माझी नसलेली कामंही मी करतो. कारण माझे सहकारी ती करत नाहीत. माझी कंपनी ही मोठमोठ्या कलाकारांना घेऊन कार्यक्रम आयोजित करत असते आणि माझ्यावर ही जबाबदारी असल्यामुळे मला कामाच्या बाबतीत चोख राहावं लागतं. कलाकार आणि माझी टीम या दोघांनाही व्यवस्थित हँडल करावं लागतं, पण मला नाही जमत आहे.’ महेश पोटतिडिकीने सांगत होता. कारण शेवटी नाही म्हटलं तरी त्याच्यावर मोठी जबाबदारी होती, ती त्याच्या कंपनीचं नाव राखण्याची!
त्याच्याशी बोलताना एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे महेशकडे प्रामाणिकपणा, ज्ञान आणि सच्चाई होती, पण या सर्वांच्या जोडीला आवश्यक असणारा आत्मविश्वास कुठेतरी डळमळीत झालेला वाटला आणि याचं महत्त्वाचं कारण होतं त्याच्या ‘मूल्यांचे द्वंद्व (Conflict of Values)’. त्याचा परिणाम असा होत होता की, त्याला आता कामाच्या बाबतीत कुठलाही निर्णय घेताना ठामपणा येत नव्हता. अतिविचार होत होते. त्यामुळे महेश वरकरणी जरी शांत असला तरी आतून चिडचिडा झाला होता. त्याचा उत्साह जात चालला होता. महेशसाठी असलेल्या सत्रांमध्ये त्याच्या विचार करण्याच्या पद्धतींचा जास्तीत जास्त अभ्यास करण्यात आला. कारण त्याची विचार करण्याची पद्धत ही बरीचशी ‘आदर्श (Ideal)’ होती. म्हणजेच ;
– मला सगळी कामं जमलीच पाहिजेत. (नाहीतर माझ्यात काही अर्थ नाही.)
– सगळ्यांनी माझ्या कामाचे कौतुक केलेच पाहिजे. (अन्यथा माझे काम चांगले नाही आणि लोकांना कदर नाही.)
– वरिष्ठ मला सगळ्यांसमोर बोलले. (हे माझ्यासाठी अत्यंत निंदनीय आहे.)
– मी चांगले काम केले हे मी कुणालाही स्वतः सांगणार नाही. (नाहीतर लोक मला दीडशहाणा समजतील आणि स्वतःच स्वतःची स्तुती करणं हे आत्मप्रौढीचं लक्षण आहे.)
– मी कुणालाच नाही म्हणू शकत नाही. (कारण त्यांचा अपमान होईल आणि असं वागणं हे चांगुलपणाचं लक्षण नाही.)
महेशच्या बोलण्यातून त्याचं लहानपणही उलगडत गेलं. त्याचे वडील हे एका शाळेचे शिक्षक आणि नंतर मुख्याध्यापक होते. त्यामुळे घरात शिस्त आणि मुख्य म्हणजे त्याच्या घराला वागण्या-बोलण्याच्या ठरावीक साचेबद्ध पद्धती होत्या. त्याच्या घरातील सदस्य हे कायम इतरांशी आदराने बोलणारे आणि नियम पाळणारे होते. त्यामुळे महेश त्या सर्वांचा पगडा होता.
त्याला त्याच्या ‘साचेबद्ध आणि आदर्श’पणातून बाहेर काढणं गरजेचं होतं. कारण तो ‘बाहेरचं जग हे अयोग्य’ या संकल्पनेत अडकत चालला होता. आपणसुद्धा थोड्याफार फरकाने या विचारधारेत कधी ना कधी अडकतो. ही विचारधाराच आपल्याला मग योग्य-अयोग्य, चांगला-वाईट, चूक-बरोबर या अशा ‘कडक’ आणि ‘पक्षपाती’ (Biased) संकल्पनेत अडकवून टाकते. आपल्याला काहीसं Rigid (आपल्याच मतावर ठाम) बनवते.
यातून बाहेर पडून मन:स्वास्थ्य टिकवायचं असेल तर ‘स्वतःला स्वतःच्या गुणदोषांसकट स्वीकारणं’ गरजेचं आहे. जेव्हा असं आपण करू तेव्हाच आपण आपल्या चुकांबद्दल स्वतःला कमी कठोर होऊन माफ करत जाऊ. एकदा हे आपण जमवलं तरच आपले चांगले गुण मोकळेपणाने स्वीकारून त्यांना खुल्या दिलाने शाबासकीही देऊ शकू.
अवघड नसतं हे! फक्त करावं लागतं आणि खूप छानही वाटतं. महेशला ते जमलंय. आता तो ‘स्वतःला शेवटची ट्रीट कधी दिलेली?’ हे तारखेसकट सांगतो. आणि महत्त्वाचं म्हणजे तो आता गाण्याच्या चाली बनवायला लागलाय. त्याने ठरवलंय, याच क्षेत्रात पुढे जायचं. आपणही हे असं काहीसं आपल्यापुरतं आणि आपल्याकरिता ठरवूया! हो ना!!
(लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत.)




























































