
तब्बल 62 दिवसांनी पंढरपूरमधील लालपरी रस्त्यांवर धावायला लागली. परिवहन मंत्री अनिल परब काल पंढरपूर दौऱ्यावर होते. यावेळी शिवसेनेचे सोलापूर जिल्हा समन्वयक प्रा. शिवाजी सावंत यांनी एसटी कामगार आणि मंत्री महोदय यांच्यात चर्चा घडवून आणली. या चर्चेत सावंत यांची शिष्ठाइ कामे येऊन बहुतांश कामगारांनी आपला संप मागे घेत कामावर रुजू झाले.
गेल्या दोन महिन्यांपासून बस सेवा बंद असल्याने श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांचे हाल होत होते. महाराष्ट्राची दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तीर्थक्षेत्री दररोज 200 हुन अधिक बसेसची वर्दळ होत होती. बस कामगारांनी काम बंद आंदोलन केल्याने पंढरपूरमध्ये भाविकांच्या संख्येत मोठी घट झाली होती. काल परिवहन मंत्री परब यांच्याशी कामगारांनी संवाद साधल्यानंतर कामगारांचे मन वळविण्यात यश आले.
पंढरपूरमधून महाराष्ट्रात सर्वत्र बस सेवा सुरु असते. या बस स्थानकात 78 बस सेवा सेवेत आहेत त्यापैकी 14 बसेस आज सुरु करण्यात यश आले आहे. सोलापूर, पुणे, कोल्हापूर सह ग्रामीण भागात बसेस सुरु झाल्या आहेत. आज प्रा सावंत यांच्या उपस्थितीत 14 बसेस आज बसच्या फलाटावर लागल्या आणि प्रवाश्यांनी सेवेचा लाभ घेण्यास सुरुवात केली. यावेळी अनिल सावंत, शिवसेनेचे रवी मुळे सुधीर अभंगराव आदी उपस्थित होते.























































