
गेट वे ऑफ इंडियापासून काही अंतरावर अरबी समुद्रात बोट कलंडल्याची घटना आज सकाळी घडली. बोट कलंडल्याने समुद्रात बुडत असलेल्या दोघांचे मुंबई पोलिसांनी प्राण वाचवले आहेत.
सांताक्रुझ येथील रहिवासी असलेले विकास साळवी आणि निकिता दमानिया हे आज दोघे ‘मोनालिसा’ या बोटीने गेट वे ऑफ इंडिया येथून अरबी समुद्रात जात होते. काही अंतर गेल्यावर बोट कलंडल्याने विकास आणि निकिता हे पाण्यात पडले. त्या दोघांना वाचवण्यासाठी मोनालिसा बोटीतील मास्टर आरिफने पाण्यात उडी मारली. तेव्हा यलो गेट पोलिसांची इंद्रायणी नौका हा तेथे गस्त करत होती. समुद्रात दोन जण बुडाल्याचे गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या निदर्शनास आले.
बोटीवर असलेले सहायक पोलीस उपनिरीक्षक वसईकर, मनोज पाटील, जोवेकर, बुंदिले हे घटनास्थळी गेले. पोलिसांनी त्या दोघांना रस्सीच्या सहाय्याने सुखरूप बाहेर काढले. या घटनेची माहिती कुलाबा पोलिसांना देण्यात आली. काही वेळातच कुलाबा पोलीस घटनास्थळी आले. नेमकी बोट कशामुळे कलंडली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.


























































