
डॉ. प्रीतम भि. गेडाम, [email protected]
युवाशक्तीमध्ये ध्येय, उत्साह, धाडस, संयम, चिकाटी, सोनेरी स्वप्ने असतात. या अमूल्य वारशाचा योग्य वापर हा देशाच्या प्रगतीचा मार्ग आहे. देशाचे भवितव्य या तरुणांच्या खांद्यावर आहे, देशाला सशक्त आणि विकसित बनविण्याकरिता तरुणांना योग्य संस्कारमूल्ये, मार्गदर्शन यांची गरज आहे. त्यासाठी योग्य वातावरण निर्माण करून देणे आवश्यक आहे, तेव्हाच खऱ्या अर्थाने सुसंस्कृत समाज घडून देश प्रगतीच्या मार्गावर लागेल. उद्याचा दिवस खूप खास आहे. कारण ‘राष्ट्रीय युवा दिन’ संपूर्ण देशात युवाशक्ती म्हणून साजरा केला जातो. उद्या (12 जानेवारी) स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांची जयंती आहे.
आज आपल्या आजूबाजूचे वातावरण पाहिल्यास असे जाणवते की, माणसांचे वर्तन हे सातत्याने संस्काराच्या मर्यादा ओलांडून वाटचाल करत आहे. सर्वत्र द्वेष, लोभ, ताणतणाव, गुन्हेगारी, फसवणूक, भ्रष्टाचार, खोटेपणा, घरगुती वाद, गोंगाट, प्रदूषण शिगेला पोहोचलेले दिसते. मुलांमध्ये वाढती गुन्हेगारी आणि अमली पदार्थांचे व्यसन ही मोठी समस्या बनत आहे. कुठे संयुक्त कुटुंब लहान तुकडय़ांमध्ये विभागले जात आहे, तर कुठे नाती ताणली जात आहेत. आजच्या काळात स्वाभिमान, प्रामाणिकपणा, कर्तव्यदक्षता, समर्पण, समाधान, संयम, परोपकार, समता, बंधुता या शब्दांना काहीच किंमत वाटत नाही.
अन्यायकारक वागणूक मिळते हे माहीत असूनही हल्ली सर्वजण मौन पाळत प्रेक्षकांची भूमिका बजावतात. चुकीची गोष्ट थांबवायची कोणातच हिंमत नसते, त्यामुळे चुकीच्या कामांना सतत प्रोत्साहन मिळते. जोपर्यंत समस्या स्वतःवर येत नाही तोपर्यंत दुसऱ्याच्या समस्येचे गांभीर्य कळत नाही. आपला समाज प्रगती करीत आहे की अधोगती?
एखादी व्यक्ती जितक्या उच्च पदावर असते तितकीच ती त्याच्या कामासाठी जनतेला जबाबदार असते. समस्येसाठी आपण अनेकदा एकमेकांवर आरोप करतो, पण ज्यांना आपण मतदानाने निवडून विकासासाठी सत्तेत बसवतो, त्यांनाच प्रश्न विचारण्यात आपण टाळाटाळ करतो. सरकारी नियमांची सर्रास पायमल्ली केली जाते. भोळय़ाभाबडय़ा लोकांच्या मजबुरीचा गैरफायदा घेण्यासाठी लोभी लोक नेहमी तयार असतात. ऑक्सिजनचे महत्त्व जाणूनसुद्धा मोठय़ा प्रमाणात झाडे तोडली जातात. लोक घरासमोरील रस्त्याला आपल्या वैयक्तिक मालमत्तेप्रमाणे मानतात आणि हळूहळू अतिक्रमण करून रस्ता कमी करतात, पण आपली छोटीशी चूक इतरांसाठी किती वेदनादायी ठरू शकते याचा कधी विचारच करत नाही.
एकीकडे लोक भुकेने जीव गमावत आहेत, तर दुसरीकडे हजारो टन धान्याची नासाडी होत आहे. रोज अनेक समस्या आपल्या समोर दिसतात, म्हणजे एकाचा निष्काळजीपणा, भ्रष्टाचाराची शिक्षा दुसऱयांना भोगावी लागते. लोक अनेकदा सरकारी नियमांचे उल्लंघन करतात, असभ्य वर्तन करतात, उघडय़ावर कचरा जाळतात किंवा फेकतात, नेहमी भांडायला तयार असतात, मुलांसमोर खोटे बोलतात किंवा त्यांना खोटे बोलायला लावतात. लोकांच्या दुःखावर हसतात आणि सुखाचा हेवा करतात. लोक काय म्हणतील, कशाला विनाकारण त्रास, आपण दूरच बरे, अशी सध्याची मानसिकता आहे,
आता माणसाचा दर्जा, प्रतिष्ठा त्याची संपत्ती ठरवते, त्याचे गुण नव्हे. एक रुपया किमतीची वस्तू देखाव्याचे खोटे लेबल लावून शंभर रुपयांना विकली जाते. चांगल्या गोष्टीला किंमतही मिळत नाही, हीच खरी परिस्थिती आहे. आपल्या देशात लोकसंख्या झपाटय़ाने वाढत आहे. वृद्धाश्रम, अनाथाश्रम वाढत आहेत. कारण घरांमध्ये ज्येष्ठांचे वर्चस्व आणि आदर कमी केला जात आहे.
आज अनेक घरांत मुले आपल्या आई-वडिलांना घरातील वृद्धाशी गैरवर्तन करताना बघतात आणि हीच आई-वडील आपल्या मुलांपासून अपेक्षा करतात की, त्यांची मुले सुसंस्कृत होऊन आपली सेवा करून समाजात आपले नाव रोशन करावे. सर्व पालकांना त्यांच्या मुलांच्या आनंदाची आणि उज्ज्वल भविष्याची काळजी असतेच, पण मुलांसाठी योग्य वातावरण निर्माण करणेदेखील त्यांची जबाबदारी असते. ते आपल्या मुलांना समाजावर किंवा देशावर लादू शकत नाहीत. आपली मुलं बाहेर कोणत्या वातावरणात राहतात? कोणत्या मित्रांसोबत वेळ घालवतात? किती खरे-खोटे बोलतात? कोणाशी भेटीगाठी करतात? आज किती टक्के पालकांना या विषयाची जाणीव आहे? पालक दररोज मुलांसोबत किती वेळ घालवतात, या प्रकरणाचा गांभीर्याने विचार होणे अत्यंत गरजेचे आहे.
उद्याचा दिवस खूप खास आहे. कारण ‘राष्ट्रीय युवा दिन’ संपूर्ण देशात युवाशक्ती म्हणून साजरा केला जातो. उद्या (12 जानेवारी) स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांची जयंती आहे. जिजामाता यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना सुसंस्कृत मार्गदर्शन करून सर्वोत्कृष्ट माता आणि गुरू म्हणून संपूर्ण जगात आदर्श निर्माण केला आहे. तरुणांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांनी तरुणांना संबोधित करताना ‘उठा, जागे व्हा, यश मिळेपर्यंत संघर्ष करा’ असा ऊर्जावान संदेश दिला. यशाचा कोणताही शॉर्टकट नसतो. तरीही आजची तरुणाई मेहनत करण्याऐवजी झटपट प्रगती करण्यासाठी शॉर्टकटचा मार्ग अवलंबणे पसंत करते, देशातील वाढती बेरोजगारी, आर्थिक विषमता, महागाई आणि इतर सामाजिक समस्या विकासात अडथळे निर्माण करतात. जागतिक स्तरावर हिंदुस्थानात तरुणांची सर्वाधिक लोकसंख्या आहे. या युवावर्गाने देशाच्या विकासाची खंबीर शक्ती बनावे, देशावर ओझे बनून समस्या वाढवू नये ही जबाबदारी पालक, समाज तसेच शासनाची आहे. युवाशक्तीमध्ये ध्येय, उत्साह, धाडस, संयम, चिकाटी, सोनेरी स्वप्ने असतात. या अमूल्य वारशाचा योग्य वापर हा देशाच्या प्रगतीचा मार्ग आहे. देशाचे भवितव्य या तरुणांच्या खांद्यावर आहे, कारण ज्याप्रमाणें भक्कम इमारतीसाठी असा मजबूत पाया आवश्यक आहे तसेच देशाला सशक्त आणि विकसित बनविण्याकरिता तरुणांना योग्य संस्कारमूल्ये, मार्गदर्शन यांची गरज आहे. त्यासाठी योग्य वातावरण निर्माण करून देणे आवश्यक आहे, तेव्हाच खऱ्या अर्थाने सुसंस्कृत समाज घडून देश प्रगतीच्या मार्गावर लागेल.


























































