Breaking – विराट कोहलीनं टीम इंडियाच्या कसोटी संघाचं कर्णधारपद सोडलं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विराट कोहली याने टीम इंडियाच्या कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले आहे. कर्णधारपदाचा विराटने राजीनामा दिला असून ट्विट करून त्याने ही माहिती दिली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत पराभव स्वीकारावा लागल्यानंतर विराट कोहलीने कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली.

‘टीमला योग्य दिशेने नेण्यासाठी गेल्या 7 वर्षांपासून कठोर मेहनत घेतली आणि अथक प्रयत्न केले. मी प्रामाणिकपणे काम केले. परंतु कधी-कधी तुम्हाला थांबावे लागते आणि माझ्यासाठी कसोटी कर्णधार म्हणून थांबण्याची हीच योग्य वेळ आहे’, असे विराटने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे.

विराट कोहली हिंदुस्थानचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार आहे. 2014 मध्ये विराटकडे टीम इंडियाच्या कसोटी संघाची धुरा आली. गेल्या सात वर्षात विराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 68 कसोटी सामने खेळले. यात टीम इंडियाला 40 विजय मिळाले, 17 लढतींमध्ये पराभव स्वीकारावा लागला, तर 11 लढती अनिर्णित राहिल्या.

कर्णधार असताना विराटची फलंदाजीतीत कामगिरीही जबरदस्त आहे. 68 कसोटीतील 113 डावांमध्ये फलंदाजी करताना विरटाने 54.80 च्या सरासरीने 5864 धावा चोपल्या आहेत. यात त्याच्या 20 शतकांचा आणि 18 अर्धशतकांचा समावेश आहे. नाबाद 254 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.

हुश्श..! कोहली, अश्विन आणि राहुल मोठ्या संकटातून वाचले, ‘ते’ प्रकरण आले असते अंगाशी

दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच त्याने टी-20 संघाचे कर्णधारपद सोडले होते, तर वन डे संघाचे कर्णधारपद त्याच्याकडून काढून घेण्यात आले होते. त्याच्या जागी रोहित शर्माकडे टी-20 आणि वन डे संघाचे कर्णधारपद देण्यात आले होते. आता कसोटी संघाचे कर्णधारपदही विराटने सोडल्याने तिथेही रोहितची वर्णी लागण्याची शक्यता आहे

दुबईमध्ये झालेल्या टी-20 विश्वचषकापूर्वी विराट कोहली याने आपण टी-20 संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याची घोषणा केली होती. तिन्ही फॉर्मेटमध्ये टीम इंडियाचे कर्णधारपद भूषवत असताना कामाचा ताण पडत असल्याचे विराटने म्हटले होते. त्यानंतर विराट कोहली एक दिवसीय संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याचीही चर्चा सुरू झाली. मात्र त्याने घोषणा करण्यापूर्वीच बीसीसीआयने रोहित शर्माकडे टी-20 सह एक दिवसीय संघाचे कर्णधारपदही दिले.

IPL 2022 धोनीचा उत्तराधिकारी ठरला, ‘सीएसके’च्या ट्विटमधून मिळाले स्पष्ट संकेत