महिला कलाकारांशी गैरवर्तन केल्यामुळे मालिकेतून काढले! किरण मानेप्रकरणी वाहिनीने केला खुलासा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजकीय भूमिका मांडल्याने ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून आपल्याला तडकाफडकी बाहेरचा रस्ता दाखवल्याचा आरोप अभिनेते किरण माने यांनी केला होता. दरम्यान, याप्रकरणी आता ‘स्टार प्रवाह’ वाहिनीने चुप्पी तोडली आहे. रविवारी वाहिनीने अधिकृत निवेदन जारी करत किरण माने यांना मालिकेतून राजकीय भूमिकेमुळे नव्हे तर सेटवर महिला कलाकारांसोबतच्या गैरवर्तणुकीमुळे काढल्याचे म्हटले आहे.

वाहिनीने निवेदनात म्हटलेय, ‘‘मुलगी झाली हो’ या शोमध्ये विलास पाटील यांची व्यक्तिरेखा साकारणारे अभिनेते किरण माने यांनी लावलेले आरोप बिनबुडाचे आणि काल्पनिक आहेत. अनेक सहकलाकार, दिग्दर्शक आणि शोच्या इतर युनिट सदस्यांचा ते अनादर करायचे. या आक्षेपार्ह वागणुकीविरुद्ध त्यांच्याविरोधात अनेक तक्रारी दाखल केल्या होत्या.’’ निवेदनात पुढे म्हटलेय, “या तक्रारीनंतर माने यांना अनेकदा समज दिली होती, पण त्यांच्या वर्तनात बदल झाला नाही.’

मालिकेच्या शूटिंगला गावकऱ्यांचा विरोध 

‘मुलगी झाली हो’ या मालिकेचे चित्रीकरण सातारा जिल्ह्याच्या वाई तालुक्यातील गुळुंब गावात सुरू आहे. मात्र किरण माने यांना मालिकेतून काढल्यानंतर गुळुंब ग्रामपंचायतीने एक परिपत्रक जारी करत मालिकेचे चित्रीकरण करण्यास परवानगी नाकारली आहे. गुळुंब गावाच्या सरपंच स्वाती माने यांनी याबाबतचे पत्र ‘स्टार प्रवाह’ वाहिनी आणि ‘मुलगी झाली हो’ मालिकेच्या टीमला पाठवले आहे.

मी बी कंबर कसलेली हाय…  किरण माने यांचा निर्मात्यांवर निशाणा 

दरम्यान, रविवारी किरण माने यांच्या फेसबुक पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे. पोस्टमध्ये त्यांनी म्हटलेय, ‘‘आपली तुफानी मोहीम पाहून, घाबरून जाऊन प्रॉडक्शन हाऊसकडून पुढच्या मोठय़ा कारस्थानाचा भाग सुरू आहे. आज मीडियावाले सेटवर जाणार आहेत…अनेक कलाकारांवर माझ्याविरोधात बोलण्याची सक्ती केली आहे. करूद्या आरोप… ते बिचारे ‘पोटार्थी’ आहेत. प्रॉडक्शन हाऊसविरोधात बोलणे त्यांच्या पोटावर पाय आणेल. माझ्यासारखे काढून टाकले जाईल म्हणून हादरलेत बिचारे. चारेक संघविचारी खरोखर माझ्या विरोधात आहेत. बाकीच्यांवर मनाविरुद्ध जाऊन माझ्या विरोधात बोलावे लागणार. तरीही ज्यांच्या पाठीचा कणा मजबूत आहे ते ‘सत्य’ सांगतीलच! पण दोस्तांनो, असल्या भंपकपणावर विश्वास ठेवू नका. मराठीत लोटांगण घालणारे आणि लाळघोटे कलाकार ढीग आहेत. त्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा हे तुम्ही ठरवा! मी बी कंबर कसलेली हाय… कच्च्या गुरूचा चेला नाय मी!’’ असे माने यांनी म्हटले आहे.