
मांडीच्या मांसपेशींच्या दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिका दौऱयाला मुकलेला हिटमॅन रोहित शर्मा बंगुळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतील व्यायाम आणि उपचारांनी ठीक होत असल्याचे आनंददायक वृत्त आहे. रोहित पुढच्या महिन्यात 6 ते 12 फेब्रुवारी या कालावधीत हिंदुस्थानात खेळवण्यात येणाऱया 3 वन डे आणि 3 टी 20 लढतींच्या मालिकेत खेळू शकेल, अशी अपेक्षा हिंदुस्थानी क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) व्यक्त केली आहे.
बीसीसीआयच्या सूत्रांनी माहिती गुप्त राखण्याच्या अटींवर रोहित शर्माच्या फिटनेसबाबत आशादायक माहिती दिली आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत रोहितच्या फिटनेसमध्ये उत्तम सुधारणा होत आहे. अहमदाबाद येथे खेळविल्या जाणाऱया वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या वन डेसाठी तो उपलब्ध होईल, अशी अशा आहे. या लढतीला अद्याप तीन आठवडे बाकी असून तेवढय़ा कालावधीत रोहित पूर्ण फिट होऊ शकतो, असे मत राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या तज्ञांनी व्यक्त केले आहे.
रोहितच्या मैदानातील पुनरागमनाकडे चाहत्यांचे लक्ष
कसोटी कर्णधार विराट कोहलीने कसोटी संघाचेही नेतृत्व सोडल्याने आता हिंदुस्थानी क्रिकेट चाहत्यांचे लक्ष हिटमॅन रोहितच्या मैदानातील पुरागमनाकडे लागले आहे. मात्र संघाच्या नेतृत्वाची मोठी जबाबदारी पार पाडण्यासाठी रोहितला आपल्या फिटनेसवर काटेकोर लक्ष ठेवावे लागणार आहे. आता राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत फिटनेससाठी झटणाऱया रोहितला अकादमीचे फिटनेस प्रमाणपत्र मिळाल्यावरच पुन्हा मैदानात खेळायला मिळणार आहे. वन डे आणि टी 20 संघाचे नेतृत्व बीसीसीआयने अगोदरच रोहितला बहाल केले आहे. आता कसोटी संघाचे नेतृत्व कुणाला मिळतेय, याकडे सर्वांचे लक्ष आहे. मात्र या स्थितीत रोहितकडून क्रिकेट शौकिनांच्या आशा अधिकच वाढल्या आहेत. त्यामुळे फिटनेस आणि कामगिरीत सातत्य या दोन्ही गोष्टींचा समतोल रोहितला राखावा लागणार आहे.



























































