
बिर्याणी हा अनेकांचा आवडता पदार्थ. हॉटेलमधून आणलेली बिर्याणी ही पोटभर खाता येत नाही अशी खंत अनेकांना असते. पण घरी बिर्याणी बनवायची म्हटलं की केवढा तो घाट. अनेक बायका त्यामुळे बिर्याणी बनवायचा कंटाळा करतात. त्यामुळे आज आम्ही आपल्याला चिकन बिर्याणीची सोप्पी रेसिपी सांगणार आहोत.
साहित्य – अर्धा किलो चिकन, अर्धा किलो बासमती तांदूळ, पाच मोठे कांदे, एक मध्यम आकाराच्या टोमॅटोची प्युरी, 100 ग्रॅम दही, अर्ध्या लिंबाचा रस, मीठ, मसाला, बिर्याणी मसाला, धणे पावडर, जीरे पावडर, खडा मसाला (2 मोठ्या वेलची, लवंगा, काळीमीरी, दालिचीनी, तमालपत्र, जावित्री) तूप, काजू, बदाम.
कृती – सर्वप्रथम कांदे उभे पातळ चिरून घ्यावे. कढईत तेल गरम करावे. त्यात कांदे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यावे. (कांद्याला चॉकलेटी रंग येतो, पण असे करताना कांदा करपवू नये). नंतर चिकन स्वच्छ धुवून ज्या भांड्यात शिजवायचे आहे त्यात काढून घ्यावे.नंतर त्यात मीठ व खडा मसाला, लिंबाचा रस लावावा. त्यानंतर त्यात हळद, मसाला, बिर्याणी मसाला, धणे पावडर, जिरे पावडर आपल्या अंदाजानुसार टाकावी. त्यावर दही घालावे. त्यावर तळलेल्या कांद्यातील अर्ध्याहून जास्त कांदा चुरून चिकनवर घालावा. चिकनवर टाकलेले सर्व मसाले, दही व तळलेल्या कांद्याचा चुरा सर्व व्यवस्थित चिकनला लावावा. हे मिश्रण तासभर मॅरिनेट व्हायला ठेवावे. त्याचवेळी बासमती तांदूळ स्वच्छ धुवून पाण्यात तासभर भिजत ठेवावे. एक तास झाला की एका मोठ्या पातेल्यात पाणी घेऊन ते उकळायला ठेवावे. त्यात चवी नुसार मीठ, जीरं खडा मसाला, जीरे, तूप घालावे. पाण्याला चांगली उकळी आली की त्यात भिजवलेले तांदूळ घालावे. दरम्यान चिकनचा टोप देखील गॅसवर ठेवावा. त्यात वरून दोन चमचे तूप घालावे. कोथिंबीर व पुदिना बारिक चिरून घालावा. चिकन अर्धे शिजले की त्या ग्रेव्हीमध्ये टोमॅटोची प्युरी घालावी. त्यानंतर झाकण लावून चिकन चांगले शिजू द्यावे. भात 90 टक्के शिजला की एका चाळणीत काढून व्यवस्थित निथळून घ्यावा. चिकन थंड होऊ द्यायचे व भातातील सर्व पाणी निथळून घ्यायचे. त्यानंतर सर्व भात चिकनवर पसरायचा. त्यावरून तळलेला कांदा, कोथिंबीर, पुदीना, तळलेले काजू बदाम घालावे. त्यानंतर एका गॅसवर तवा ठेवावा. त्यावर बिर्याणीचा टोप ठेवून एक चांगली वाफ काढावी. गरमा गरम हॉटेलसारखी बिर्याणी तयार आहे.
























































