टीम इंडियावर दंडात्मक कारवाई; राहुलची सेना खेळात अन् योजनेतही अपयशी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोकेश राहुलच्या नेतृत्वाखालील हिंदुस्थानी क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिका दौऱयावर अपयशाचा धनी ठरला. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत ‘टीम इंडिया’च्या विजयाची पाटी कोरीच राहिली. याचबरोबर तिसऱया सामन्यात निर्धारित वेळेत गोलंदाजी पूर्ण न केल्यामुळे हिंदुस्थानी क्रिकेटपटूंना दंडात्मक कारवाईलाही सामोरे जावे लागले.

तिसऱया एकदिवसीय लढतीत हिंदुस्थानी गोलंदाजांनी निर्धारित वेळेपेक्षा दोन षटके कमी टाकली. त्यामुळे सामनाधिकारी ऍण्डी पायक्रॉफ्ट यांनी हिंदुस्थानी संघातील प्रत्येक खेळाडूचे 40 टक्के मानधन कापण्याचा निर्णय घेतला. आयसीसीच्या घटनेतील कलम 2.22नुसार प्रत्येक षटकाच्या विलंबास खेळाडूंच्या मानधनातील 20 टक्के रक्कम कापली जाते. हिंदुस्थानी कर्णधार लोकेश राहुलने आपली चूक मान्य केली. त्यामुळे औपचारिक सुनावणीची गरज भासली नाही. मैदानी पंच मराईस इरास्मस व बोंगानी जेले, तिसरे पंच अलाउद्दीन पालेकर व चौथे पंच एड्रियन होल्डस्टॉक यांनी रविवारी तिसरा सामना संपल्यानंतर ‘टीम इंडिया’वर दोन षटके उशिरा गोलंदाजी केल्याचा आरोप केला होता. दक्षिण आफ्रिकेने हा सामना 4 धावांनी जिंकून मालिकेत 3-0 असे निर्भेळ यश संपादन केले.