डोंगरी पोलिसांचा एपीआय 18 हजार घेताना ट्रॅप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मटक्याच्या गुन्ह्यामध्ये चुलत भावावर कारवाई न करण्यासाठी 20 हजारांची लाच मागून तडजोडीअंती खासगी इसमाकरवी 18 हजार घेताना डोंगरी पोलीस ठाण्याचे एपीआय संजीव निंबाळकर (51) यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

निंबाळकर यांच्या विरोधात तक्रार करणारे विवेक (नाव बदललेले) यांचा चुलत भाऊ डोंगरी परिसरात राहतो. संजीव निंबाळकर यांनी विवेक यांच्या भावाला चौकशीसाठी बोलावले होते. तेव्हा चौकशीदरम्यान त्याच्याकडे मटक्याच्या आकडय़ाच्या चिठ्ठय़ा मिळाल्या. तेव्हा निंबाळकर यांनी खासगी इसम महमद अली वली मन्सुरी यांच्याकरवी विवेक यांना संपर्क साधला आणि भावावर कारवाई होऊ द्यायची नसेल तर 20 हजार दे, अशी मागणी केली. मात्र विवेक यांना लाच द्यायची नसल्याने त्यांनी ऍण्टी करप्शन ब्युरोकडे तक्रार केली. दरम्यान, गुरुवारी तडजोडीअंती विवेक यांच्याकडून मन्सुरीकरवी 18 हजार घेताना ऍण्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने मन्सुरी आणि निंबाळकर यांना पकडले. मन्सुरी याला अटक केली असून निंबाळकर कोविड पॉझिटिव्ह सापडल्याने त्यांना सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.