कोल्हापुरात भेळविक्रेत्यावर हल्ल्याचा प्रयत्न; तिघे ताब्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऐतिहासिक छत्रपती शाहू खासबाग मैदान परिसरातील खवय्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या राजाभाऊ भेळचे मालक रवींद्र शिंदे यांच्यावर काही तरुणांनी प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली. या हल्लेखोरांना जमावाने चोप देत जुना राजवाडा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.

अभिषेक संजय सरदार (वय 19, रा. योगेश्वर कॉलनी, पाचगाव), गणेश लिंगाप्पा एलगट्टी (वय 19, घाटगे कॉलनी), प्रथमेश गायकवाड (दोघे रा. संभाजीनगर, सर्व पाचगाव) अशी हल्लेखोरांची नावे आहेत.

हे तरुण भेळ घेण्यासाठी सोमवारी रात्री आले होते. त्यावेळी थुंकण्यावरून किरकोळ वाद झाला होता. मंगळवारी सायंकाळी हे तरुण पुन्हा राजाभाऊ भेळसमोर आले. रात्रीचा वाद उकरून काढून रवींद्र शिंदे यांच्या अंगावर धावून जात त्यांच्यावर हत्यार उगारले. आसपासच्या नागरिकांनी धाव घेत या हल्लेखोर तरुणांना चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले.