गडहिंग्लजमध्ये तीन सराईत दुचाकीचोर गजाआड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गडहिंग्लज पोलिसांनी नाकाबंदी करून तीन दुचाकीचोरांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून चोरीच्या तीन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या असून, दुचाकीचोरीचे आणखी दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यांचा एक साथीदार फरार आहे.

ओंकार अनिल महाडिक (वय 20) व समर्थ सुनील महाडिक (वय 19, दोघे रा. मुगळी), सलमान शब्बीर सय्यद (वय 27, रा. गवळीवाडा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अमर सिदनाक महाडिक (वय 27, रा. मुगळी, ता. गडहिंग्लज) हा फरार आहे.

गडहिंग्लजच्या आठवडी बाजारादिवशी येथील दसरा चौकात नाकाबंदी करून वाहनतपासणी सुरू होती. यादरम्यान दुपारी 3च्या सुमारास दोन दुचाकीस्वार येत होते. गाडीला नंबरप्लेट नसल्याने त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी गाडी चोरीची असल्याचे सांगितले. त्याचबरोबर साथीदार सलमान सय्यद व अमर महाडिक यांच्यासमवेत दुचाकीचोरी करीत असल्याचे कबूल केले. त्यानंतर रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाणे (जि. पुणे) येथून दोन दुचाकी चोरल्याचे त्यांनी कबूल केले आहे. त्यांच्या ताब्यातील एक लाख 25 हजार रुपये किमतीच्या तीन दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत.

पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विक्रम वडणे, सहायक फौजदार सुहास शिंदे, सहायक फौजदार तानाजी विचारे, प्रदीप पाटील, दादू खोत, मधुकर संकपाळ यांनी कारवाई केली.