ताडोबासाठी एकात्मिक पर्यटन आराखडा सादर करा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ताडोबा हे वाघ बघण्याचे जागतिक स्तरावरचे सर्वोत्तम स्थळ व्हावे या दृष्टीने पर्यावरणाचे रक्षण करीत पर्यटन विकासाचा एकात्मिक आराखडा तयार करा. पर्यावरणाचे रक्षण करताना नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून पर्यटन विकासाला कशी चालना देता येईल याचा विचार करा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज वन विभागाला दिल्या.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पर्यटनवाढीच्या दृष्टीने करावयाच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, चंद्रपूर शहरालगत व्याघ्रसफारी आणि वन्यजीव बचाव केंद्र निर्मितीच्या प्रस्तावित करण्यात आलेल्या प्रकल्पाचे परिपूर्ण नियोजन करावे, येथे वनीकरण कार्यक्रमातून वृक्ष लागवड करण्यात यावी जेणेकरून वन्यजिवांना नैसर्गिक अधिवास मिळू शकेल. वन अकादमीनजीक जे वन्यजीव रेस्क्यू सेंटर प्रस्तावित करण्यात आले आहे त्यास सेंट्रल झू ऑथॉरिटीची मंजुरी मिळालेली आहे. याला जोडूनच व्याघ्र सफारी करण्याचेही प्रस्तावित आहे. या दोन्ही प्रकल्पाचे परिपूर्ण नियोजन करण्यात येऊन अंमलबजावणीचा कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्यात यावा. यासाठी आवश्यक असणारा निधीही टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिला जावा, असेही ते यावेळी म्हणाले.

यावेळी मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, वन विभागाचे प्रधान सचिव वेणु गोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांच्यासह वन विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते.

सोलर कुंपण वितरित करा!

मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी तसेच शेत पिकांचे नुकसान टाळण्यासाठी बफर क्षेत्रातील शेतकऱयांना वैयक्तिक सोलर कुंपण वितरित करण्याचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यतेसाठी लवकरात लवकर सादर करावा, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.