
मार्च महिना जवळ आल्याने महापालिकेने वसुली मोहीम तीव्र केली आहे. 10 लाख रुपयांच्या पुढे थकीत कर असलेल्या थकबाकीदारांची सुनावणी झाली. 45पैकी 20 थकबाकीदार सुनावणीसाठी उपस्थित होते, तर 25 थकबाकीदार आलेच नाहीत. त्यामुळे दांडी मारणाऱ्या थकबाकीदारांवर जप्तीची नोटीस काढण्यात येणार असल्याची माहिती सोलापूर महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.
थकीत कर असलेल्या थकबाकीदारांसाठी सोलापूर महापालिकेतर्फे ‘अभय योजना’ राबविण्यात येत आहे. या योजनेत करात सवलत देऊन वसुली करण्यात येत आहे. यासंदर्भात महापालिका टप्प्याटप्प्याने सुनावणी घेत आहे. दोन ते पाच लाखांपर्यंत कर थकीत असलेल्या थकबाकीदारांची सुनावणी सहायक आयुक्त, पाच ते दहा लाख रुपयांची थकबाकीदारांची सुनावणी अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्त, तर 10 लाख रुपयांच्या पुढील थकबाकीदारांची सुनावणी महापालिका आयुक्त घेत आहेत.
10 लाखांहून अधिक थकीत कर असलेल्या 45 थकबाकीदारांना नोटीस देऊन सुनावणीस बोलाविण्यात आले होते. त्यांपैकी 20 जण आले आणि 25 जण अनुपस्थित राहिले. तसेच सुनावणीत तिघांनी थकीत कराचे 62 लाख भरले. उर्वरित 17 जणांनी थकबाकी भरण्याची तयारी दर्शविली.
दरम्यान, सुनावणीस गैरहजर राहणाऱ्यांविरुद्ध 10 ते 15 दिवसांच्या आत जप्तीची नोटीस काढण्यात येणार आहे. ‘अभय योजने’त जानेवारीत थकबाकीदारांनी 13 कोटी रुपयांचा भरणा केला आहे. शास्ती, नोटीस फी, वॉरंट फी आदी दंडांच्या रकमेत ‘अभय योजने’त सूट दिली जात आहे. फेब्रुवारीअखेरपर्यंत भरल्यास या दंडाच्या रकमेत 50 टक्के सूट तर मार्चअखेरपर्यंत भरल्यास 40 टक्के सूट दिली जात आहे.
10 जणांच्या नोटिसा तयार
एक लाखापासून सर्वच थकबाकीदारांची टप्प्याटप्प्याने सुनावणी घेतली जात आहे. 10 लाखांपुढील थकबाकीदारांची सुनावणी घेतली. त्यात गैरहजर राहणाऱ्यांना जप्तीची नोटीस दिली जाणार आहे. सध्या 10 जणांच्या नोटिसा तयार असून, उर्वरित लोकांच्या नोटिसा तयार करून लवकरच बजाविल्या जाणार असल्याची माहिती सोलापूर महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.




























































