
>> मीना मंगेशकर-खर्डीकर
दीदीनं दिलेल्या आनंदाच्या क्षणांची मोजदाद मी कधी ठेवली नाही. ते शक्यही नाही. किती प्रसंग सांगू? किती आठवणींना उजाळा देऊ? सुरांच्या सम्राज्ञीला शब्दांमध्ये कसं शोधू?
डोळे मिटून दीदीचा सूर ऐकला की शाश्वततेवरचा विश्वास दृढ होतो. दृष्टी व्यापक होते. मन निर्मल होतं. परमेश्वरानं घडवलेल्या सृष्टीचं सौंदर्य या स्वरमायेच्या स्पर्शानं सचेतन होतं. कलाकार आणि माणूसपण यांच्या सीमारेषेवर जीवनाचं आरस्पानी दर्शन घडतं.
आम्हांला बहीण म्हणून दिसलेली ‘दीदी’ आणि रसिकांना गायिका म्हणून अनुभवायला आलेली ‘लता मंगेशकर’ यांच्यात फारसा फरक नाही. मी दोन्हींची साक्षीदार आहे, म्हणून घटनांचे दाखले देऊन सांगतीये इतकंच.
माझी मोठी बहीण असण्याच्या अधिकारानं मी दीदीजवळ जाऊ शकते हे माझं केवढं भाग्य. कधीकधी मी तिला दटावतेसुद्धा. तशा वेळा फार येत नाहीत; पण त्या वेळी एक जाणवतं की, दटावण्याचा अधिकार देण्यातही तिचाच मोठेपणा आहे. दीदी माझ्यापेक्षा दोनच वर्षांनी मोठी असली; तरी तिला घरातल्या कर्त्या माणसाचा मान आहे. संसारातल्या अडीअडचणीच्या प्रसंगी घरातल्या ज्येष्ठ माणसाचा कातर आवाज धीर देतो, सावरून घेतो. आमच्या मागे तर दीदीचा गोड आवाज आहे.
माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक क्षणावर या आनंदघनाची छाया आहे. माझं लग्न तिनं थाटामाटात साजरं केलं. त्या वेळी आनंदानं भारावलेली दीदी माझ्याच आयुष्यातल्या दुःखाच्या क्षणी कशी व्याकुळ झाली होती हे आठवलं की गहिवरून येतं. दोन हजार तेरा साली माझ्या यजमानांचं निधन झालं. पन्नास वर्षांचा संसार. रथाचं एक चाक अचानक निखळलं. या वेळी मला दीदीशिवाय होतं तरी कोण? या वयातही समजावून, पाठीवर हात ठेवून धीर देत मला आयुष्यात पुन्हा उभं करणारी माझी बहीण. मी तिचा असा मायेचा, आधाराचा हात माझ्याप्रमाणेच अनेकांच्या पाठीवर पाहिला आहे.
तिच्याबद्दल अजून काय लिहू?
आपण माणसांचं मोठेपण अडचणीच्या, दुःखाच्या वेळी जोखतो. त्या प्रसंगी माणसं मदतीला येतात यात विशेष नाही; पण आपल्या आनंदानं जो सुखावतो, तो खरा आपला. दीदीला तर अडचण किंवा आनंद सांगावाही लागत नाही. आजही मी प्रभुकुंजमध्ये शिरल्या शिरल्या तिला माझ्या मनातलं सारं आपसूकच उमगतं. तिच्या मायेच्या नजरेनंच मन मोकळं होतं. हलकं होतं.
गेली अनेक वर्षे असंच चाललं आहे. माझ्या शब्दांना प्रतिभेचं देणं नाही हे मी जाणते. जे काही आहे तेही दीदीचंच आहे. मग या आठवणी कशासाठी सांगायच्या? दीदी नव्यानं उमगत्येय का हे पाहण्यासाठी. एरवी घटनांना फारसा अर्थ नसतोच. धुक्याच्या पदराआड लपलेलं सृष्टिवेभव एखाद्या सोनेरी कवडशामुळे अचानक दृग्गोचर होतं. त्याच दृश्याला नवं परिमाण मिळतं. आणि त्या चित्रात आपण कुठे उभे आहोत हेही कळतं.
मी कल्पवृक्षाच्या तळवटी बसलेली आहे. त्याची सावली छान विस्तारली आहे. कित्येक वसंत अनुभवले. शिशिरातली पानगळही पाहिली. अनेक पक्ष्यांनी या वृक्षाच्या आधारानं घरटी बांधली, अनेकांनी फळं चाखली. अज्ञानी जनांनी त्यावर कुऱहाडीही चालवल्या. कुणाबद्दलही राग, आकस न धरता साऱयांना शीतलता देत सावली मोठीच होत आहे.
…आणि मला कळत नाहीये की, मी क्षणोक्षणी मोठय़ा होणाऱया सावलीकडे पाहू की जन्माची संगतसोबत करणाऱया माझ्या छोटय़ाशा ताईला पाहू?
मी दोघींच्या तालासुरात रंगून जाते. स्वतःशीच गुणगुणायला लागते…
लहान माझी बाहुली
मोठी तिची सावली…
‘मोठी तिची सावली’ या पुस्तकातून साभार. प्रकाशक – परचुरे प्रकाशन मंदिर






























































