लेख – कोरोनानंतर शाळा सुरूः शिक्षकांपुढील आव्हाने

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
teacher-1
प्रातिनिधिक

>> यशवंत तुकाराम सुरोशे

कोरोनानंतर प्रत्यक्ष शाळा सुरू होताना, प्रत्यक्षात वर्गाध्यापन करताना, व्यवस्थापन हाताळताना शिक्षकांपुढे अनेक आव्हाने आहेत. ही आव्हाने पालक, समाज, व्यवस्थापक, शासन यांना समजली तर त्यावर चर्चा होईल, उहापोह होईल. समन्वयाने काही उपाय शोधले जातील. त्रुटी दूर होतील आणि शिक्षणाची प्रक्रिया अधिक गतिमान, पूर्ववत आणि गुणवत्तापूर्वक होईल. ‘शिक्षक हा आव्हानांना पेलणारा नेता आहे, असे म्हटले जाते. तरी त्याचे पाय मातीचेच आहेत याची जाणीव ठेवून सर्वांनीच ‘शाळा सुरू आणि शिक्षणही सुरू’ या मोहिमेला हातभार लावूया. सर्वांनी आरोग्याचे नियम पाळूया म्हणजे शाळा बंदऐवजी शाळा सुरू होऊ लागतील आणि मनातल्या समस्या दूर होतील.

कोरोनाच्या महासाथीमुळे गेले दीड वर्ष बंद झालेल्या शाळांची घंटा पुन्हा वाजू लागली आहे. अर्थात अजून पूर्णार्थाने शिक्षणाची प्रक्रिया सुरू झालेली नाही. शाळा प्रत्यक्ष सुरू होण्यापूर्वी प्रसार माध्यमे आणि समाज माध्यमांवर विविध प्रकारच्या चर्चा घडल्या. प्रामुख्याने कोरोनोत्तर काळातील विद्यार्थ्यांचे शिक्षण, त्यांचा भावनिक विकास, आरोग्य, प्रगतीचे मूल्यमापन यापासून ते व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांसाठी कोणकोणत्या सोयीसुविधा पुरवाव्यात याबाबत खूप चर्चा झाली. बालमानसतज्ञांनी मुलांची मानसिकता ओळखणे, काही आजारांची लक्षणे कोणती याबाबतही माहिती पुरवली. या सगळय़ांच्या विचारमंथनातून शाळा सुरू होऊन आठवडा उलटला आहे. विद्यार्थी आणि शिक्षक शिक्षणाच्या मैदानात उतरले आहेत. खेळाचे उदाहरण घेतल्यास ज्याप्रमाणे खेळ रंगत जाण्यासाठी दोन्ही बाजू सक्षम, तुल्यबळ असावे लागतात त्याचप्रमाणे शालेय शिक्षणात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या शिक्षकांविषयी, त्यांच्यापुढील आव्हानांविषयी फारशी चर्चा झाल्याचे ऐकिवात नाही.

कोरोनानंतर प्रत्यक्ष शाळा सुरू होताना, प्रत्यक्षात वर्गाध्यापन करताना, व्यवस्थापन हाताळताना शिक्षकांपुढे अनेक आव्हाने आहेत. ही आव्हाने पालक, समाज, व्यवस्थापक, शासन यांना समजली तर त्यावर चर्चा होईल, उहापोह होईल. समन्वयाने काही उपाय शोधले जातील. त्रुटी दूर होतील आणि शिक्षणाची प्रक्रिया अधिक गतिमान, पूर्ववत आणि गुणवत्तापूर्वक होईल.

सतरा-अठरा महिने शाळेच्या नियमित वेळापत्रकापासून दूर असलेला शिक्षक दीड वर्षाने वयस्कर झाले आहेत. मुलांप्रमाणेच शिक्षकांच्या मनावर महासाथीच्या आपत्तीचा परिणाम झाला आहे. भयगंड, न्यूनगंड, अपसमज यांनी काही शिक्षक त्रस्त आहेत.

वाढते वय आणि दैनंदिन जीवनशैलीत झालेल्या बदलांमुळे शारीरिक आरोग्य बिघडलेले काही शिक्षक पूर्वीप्रमाणे सादरीकरण करण्यात कमी पडतात. काही जणांनी बोलताना थकतो, उभे राहून पाय दुखतात, जिने चढणे कठीण वाटते.

शाळा सुरू झाल्याचे समजताच निवडणूक आयोग, ग्राम स्वच्छता, तंबाखू निर्मूलन या आणि यासारख्या कार्यक्रमांना प्रचंड वेग आला आहे. नवमतदारांची नोंदणी, गरुड ऍप, राष्ट्रीय स्वच्छता अभियान स्पर्धेतील सहभाग या अतिरिक्त कामांमुळे विद्याथीं आणि शिक्षक यातील सहवास कमी होतो. संवाद अपुरा पडतो. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या जडणघडणीवर विपरित होतो.

अध्यापनाव्यतिरिक्त शालेय दफ्तरी अनेक कामे करावी लागतात. गेल्या दीड वर्षातील नोंदी आठवणे, अद्ययावत करणे, शासकीय लाभाच्या योजना राबवणे यामुळे सहकाऱ्यांमध्ये कधी कधी कुरकुर घडते. कोरोनाकाळातील एकाकीपणामुळे चिडचीड होणे, राग येणे, काम नकोसे वाटणे या भावना वाढीस लागल्या आहेत. परस्पर संबंधात दुरावा आल्याने सामूहिक कामात अडथळे येतात. कोरोनोत्तर काळात कामांची नव्याने वाटणी म्हणजे वादाला तोंड फुटणे असा प्रकार झाला आहे.

गेल्या दीड वर्षात वापरात नसलेल्या किती तरी संगणक, प्रोजेक्टर, लॅपटॉप दुरुस्तीला आले आहेत. या साधनांशिवाय ‘डिजिटल स्कूल’ ही संकल्पना अपुरी आहे. ग्रामीण भागात अशी साधने दुरुस्त करणारे तंत्रज्ञ अपुरे आहेत. शहरातून तंत्रज्ञ मागवले तर त्यांचा खर्च शाळेजवळील उपलब्ध अनुदानापेक्षा अधिक असतो. ग्रामीण भागातील अनेक शाळांतील प्रोजेक्टर बंद आहेत. हल्ली विद्यार्थ्यांचा, पालकांचा या साधनांच्या वापराविषयी किंचितसा आग्रह वाढला आहे. साधनांची दुरुस्ती किती उपलब्धतता हे शिक्षकांपुढींल आव्हान आहे.

शासनाकडून या वर्षी 70 टक्क्कांप्रमाणे पाठय़पुस्तकांचा पुरवठा झाला आहे. ग्रामीण भागातील काही शाळांनी पूर्वनियोजित करून न वापरलेले, आधीच्या वर्षांचे संच गोळा केले आणि 100 टक्के विद्यार्थ्यांना पाठय़पुस्तके वाटप केली. तरी काही शाळांमध्ये पाठय़पुस्तके अपुरी पडल्यास शिक्षकांना पालक, विद्यार्थी यांना उत्तरे द्यावी लागतात.

खरे तर समस्या अनेक मांडता येतील. त्यांना समस्या न म्हणता आव्हाने म्हणता योग्य होईल. समस्या मांडून पळ काढणे मानवी स्वभावच म्हणायचा, पण शिक्षक म्हणून या आव्हानांना सामोरे जाताना समाज, पालक, व्यवस्थापन आणि सरकार यांनीही काही हातभार लावायला हवा. उदाहरणार्थ –

कोरोनोत्तर काळात शाळा सुरू करण्यापूर्वी शिक्षकांचे समुपदेशन, मार्गदर्शन करायला हवे होते. विद्यार्थ्यांप्रमाणे शिक्षकांनाही दिलासा देणे, सहानुभूती दाखवणे यासोबत विद्यार्थ्यांसोबत करावयाच्या वर्तनाविषयी चर्चा करायला हवी होती. आता ती वेळ निघून गेली आहे.

शिक्षकांच्या आरोग्याची तपासणी, लसीकरण, योग्य आहार, विहार याविषयी मार्गदर्शन आदी कार्यक्रम शासनस्तरावर व्हायला हवेत. यातील लसीकरणाचा राष्ट्रीय कार्यक्रम जोरात सुरू आहे.

शिक्षणाच्या मैदानात उतरलेल्या विद्यार्थी आणि शिक्षकांना एकमेकांशी सूर जुळेपर्यंत अवधी द्या. त्यांना मैदानावर ‘सेट’ होऊ द्या. त्यानंतर शिकवणे, पाठय़क्रम, चाचण्या… वगैरे. याअगोदर अन्य अतिरिक्त कामांचा बोजा लादू नये. (‘अनिवार्य कर्तव्य’ या शीर्षकामुळे काहीच बोलता येत नाही.) तरी या कामांसाठी धीर धरावा एवढीच अपेक्षा. गेल्या दीड वर्षाचा ‘बॅकलॉग’ पूर्ण करण्याची घाई करू नये.

कोरोनामुळे सगळय़ाच व्यवस्था ढासळल्या आहेत. पूर्ववत होण्यास वेळ लागत आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही सुरळीत होईल. आयुष्यात वाट पाहणे आणि संयम बाळगणे शिक्षकांना माहीत आहेच. कोरोना काळात अनेक कंत्राटी कामगारांना रोजगार गमवावा लागला. स्थलांतरित व्हावे लागले. आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये कामगार कपात झाली. समाजाने शिक्षकांच्या वेतनाबाबत कधीही चर्चा केली नाही. कोरोनाकाळात सरकारी शिक्षकांना पूर्ण वेतन मिळत होते. त्यावर कोणीही टिप्पणी केली नाही. यातून समाज, पालक आणि सरकारचा शिक्षकांविषयी आदर दिसून येतो. आता वेळ आहे ती शिक्षकांनी निभावण्याची. काही खासगी व्यवस्थापनाच्या शाळा बंद पडल्या. अनेक शिक्षकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत हेही येथे नमूद करायला हवे. यातील सर्व जण नव्याने उभारी घेतील असा विश्वास आहे. ‘शिक्षक हा आव्हानांना पेलणारा नेता आहे, असे म्हटले जाते. तरी त्याचे पाय मातीचेच आहेत याची जाणीव ठेवून सर्वांनीच ‘शाळा सुरू आणि शिक्षणही सुरू’ या मोहिमेला हातभार लावूया.