सामना अग्रलेख – ओवेसी यांना सुरक्षा पॅकेज!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ओवेसी यांच्यावर उत्तर प्रदेशात झालेल्या हल्ल्यामागची खरी डोकी शोधून काढावीच लागतील, कारण आरोपींची धरपकड व हल्ल्यामागची विद्वान डोकी शोधणे यात फरक आहे. ओवेसी यांच्या सुरक्षेचा घोर यानिमित्ताने केंद्र सरकारला लागला हे काय कमी झाले? हाच घोर इतरांच्या बाबतीतही राहू द्या. आपले गृहमंत्री अमित शहा हे सहृदय वृत्तीचे, दयाळू मानसिकतेचे नेते आहेत. त्याच दयाबुद्धीने त्यांनी ओवेसी यांना सुरक्षा पॅकेज दिले. मियाँ ओवेसी यांनी ते स्वीकारायला हरकत नाही. ओवेसी यांची जान खतरे में आहे, असे देशाच्या गृहमंत्र्यांनीच सांगितल्याने चिंता वाटते!

एमआयएमचे अध्यक्ष मियाँ ओवेसी यांच्यावर उत्तर प्रदेशात हल्ला झाला. ओवेसींवरील हल्ल्याचे दुःख केंद्र सरकारला इतके झाले की, लोकसभेत निवेदन करून गृहमंत्र्यांनी ओवेसी यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षाव्यवस्था प्रदान केली आहे. बुलेटप्रूफ गाडीची व्यवस्थाही करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशात विधानसभेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री असले तरी तेथील मैदानात पंतप्रधान मोदी विरुद्ध अखिलेश यादव असा थेट सामना आहे. भारतीय जनता पक्षाला पूर्ण बहुमत मिळण्याची शक्यता आज तरी दिसत नाही. मियाँ ओवेसी यांनी 300 च्यावर उमेदवार उभे केले. त्यांच्या प्रचारार्थ भडकाऊ, वादग्रस्त भाषणे केली. तरीही मुसलमान समाजावर त्यांचा प्रभाव पडताना दिसत नाही. त्यामुळे भारतीय जनता पक्ष अस्वस्थ होणे साहजिकच आहे. ओवेसी उत्तर प्रदेशच्या रिंगणात आहेत हेच कळत नाही. इतकी नाजूक परिस्थिती असल्याने काही लोकांना वैफल्याने ग्रासणे शक्य आहे. पण दोन दिवसांपूर्वी मेरठ येथून दिल्लीला परत जात असताना हापूड येथील छिजारसी टोलनाक्यावर ओवेसींवर हल्ला झाल्याने ते चर्चेत आले आहेत. ओवेसी यांच्या धावत्या गाडीवर पाच गोळय़ा झाडल्या. त्यातली एकही गोळी लागली नाही व ते सुखरूप बचावले याबद्दल परवरदिगार अल्लाचे व परमेश्वराचे आभार मानावे तेवढे थोडेच. आम्ही या हल्ल्याची निंदा केली आहे. आम्ही ओवेसी यांना उदंड निरोगी दीर्घायु चिंतितो. मियाँ ओवेसी यांचे राजकारण एकात्मतेचे नाही. त्यांच्या शब्दा-शब्दांतून धर्मांधता स्पष्टपणे दिसत असते. त्यांना मुसलमान समाजाला मुख्य प्रवाहापासून दूर ठेवायचे असल्याने डोकी भडकविण्याचे उपद्व्याप ते करीत असतात. ओवेसी जेवढे जहर उगाळतात तेवढी

हिंदू एकजूट भक्कम

होते. म्हणूनच ओवेसींसारखे नेते टिकायला हवेत. भारतीय जनता पक्षाला तर ओवेसींची आज सगळय़ात जास्त गरज आहे. हल्ल्यातून सुखरूप बचावल्यावर मियाँ ओवेसी यांनी लोकसभेत जे भाषण केले ते सत्ताधाऱ्यांच्या डोळय़ांत अंजन घालणारे आहे. ओवेसी म्हणतात, ‘माझे डोळे कायमचे मिटतील तेव्हा औरंगजेबाच्या भूमीतच माझे दफन करा. ही माझी अंतिम इच्छा आहे!’ ओवेसी यांनी हे वक्तव्य ठरवून केले आहे. औरंग्याच्या पिलावळीस बळ मिळावे व त्यांनी रस्त्यावर उतरावे याच हेतूने त्यांनी हे जळके विधान केले. औरंग्याने हिंदुत्वरक्षक छत्रपती संभाजीराजांना निर्घृणपणे मारले. संभाजीराजांनी धर्मरक्षणासाठी बलिदान दिले, पण ते औरंग्यापुढे झुकले नाहीत. संभाजीराजांच्या निधनानंतर मराठे एक झाले व ते चिकाटीने औरंग्याशी तब्बल पंचवीस वर्षे लढत राहिले. औरंग्या मराठय़ांना पराभूत करू शकला नाहीच, उलट महाराष्ट्रातच त्याने थकून प्राण सोडला. त्याची कबर संभाजीनगरजवळ आहे. त्या कबरीवर नमाज पढण्यासाठी मियाँ ओवेसी येत-जात असतात व आता तर औरंग्याशेजारीच आपणास दफनावे अशी इच्छा व्यक्त केल्याने त्यांचे अंतरंगातले फूत्कार बाहेर पडले आहेत. उत्तर प्रदेश निवडणुकीत मुसलमान मतदारांची माथी भडकविण्यासाठी हे फूत्कार सोडले जात आहेत, हे देशवासीयांनी समजून घेतले पाहिजे. अशा ओवेसींवर उत्तर प्रदेशात गोळय़ा झाडल्या व त्या चिंतेने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ‘झेड प्लस विथ बुलेटप्रूफ कार’ असे सुरक्षा पॅकेज मियाँ ओवेसी यांना दिले आहे. इतकेच नव्हे तर, हे पॅकेज ओवेसी यांनी स्वीकारावे अशी नम्र विनंती गृहमंत्र्यांनी केली आहे. ओवेसी यांच्या जिवाचा सगळय़ात जास्त घोर भाजपास लागला आहे. ओवेसी यांचे मुसलमानी राजकारणातील महत्त्व ते जाणतात.

प. बंगालातही ओवेसींना

फिरवले, पण तेथील मुसलमानांनी त्यांना साफ झिडकारले.‘बंगाली’ म्हणून तेथील मुसलमान जनता ममता बॅनर्जी यांच्या पाठीशी उभी राहिली. उत्तर प्रदेशातही ओवेसी फॅक्टर चालताना दिसत नाही हे सत्य आहे. अशा परिस्थितीत अदखलपात्र ओवेसींवर हल्ला व्हावा याचे आश्चर्य वाटते. गृहमंत्री शहा म्हणतात, ओवेसी यांनी त्यांच्या दौऱ्याची कल्पना स्थानिक प्रशासनास दिली नव्हती. त्यामुळेसुद्धा सुरक्षा पुरविता आली नाही. हे एक वेळ मान्य केले तरी राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न असल्यामुळेच ओवेसींवर हल्ला झाला हे सत्य ते का स्वीकारत नाहीत? देशातील अनेक नेते कोणत्याही सुरक्षाव्यवस्थेशिवाय फिरतात, म्हणून एका राज्यातून दुसऱ्या राज्यात गेल्यावर त्यांच्यावर कोणी हल्ला करावा? ओवेसी यांनी मुंबई-महाराष्ट्रात येऊन अनेकदा भडकाऊ भाषणे केली, सभा घेतल्या, पण कोणी त्यांच्यावर हल्ले केले नाहीत. ओवेसींच्या भाषणाने राष्ट्रीय एकता व हिंदू समाज जास्तच एकवटला. मुसलमानही त्यांना अलीकडे स्वीकारत नाहीत. तरीही ते मुसलमानांचे प्रश्न मांडत असतात. ओवेसी यांचे मूळ स्थान हैदराबादेत आहे. त्यामुळे निजामाचे दुर्गुण त्यांच्या अंगी भिनले असावेत. ते काही असो, ओवेसी यांच्यावर उत्तर प्रदेशात झालेल्या हल्ल्यामागची खरी डोकी शोधून काढावीच लागतील, कारण आरोपींची धरपकड व हल्ल्यामागची विद्वान डोकी शोधणे यात फरक आहे. ओवेसी यांच्या सुरक्षेचा घोर यानिमित्ताने केंद्र सरकारला लागला हे काय कमी झाले? हाच घोर इतरांच्या बाबतीतही राहू द्या. आपले गृहमंत्री अमित शहा हे सहृदय वृत्तीचे, दयाळू मानसिकतेचे नेते आहेत. त्याच दयाबुद्धीने त्यांनी ओवेसी यांना सुरक्षा पॅकेज दिले. मियाँ ओवेसी यांनी ते स्वीकारायला हरकत नाही. ओवेसी यांची जान खतरे में आहे, असे देशाच्या गृहमंत्र्यांनीच सांगितल्याने चिंता वाटते!