
कथानकापासून ते तंत्रज्ञानापर्यंत मराठी चित्रपटसृष्टीत सातत्याने नवनवीन प्रयोग पाहायला मिळत आहेत. असाच हटके प्रयोग आगामी ‘पाँडीचेरी’ या चित्रपटानिमित्ताने पाहायला मिळणार आहे. स्मार्टफोनवर चित्रित करून प्रदर्शित होणारा हा देशातील पहिला चित्रपट आहे. अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी, व्हिस्टास मीडिया कॅपिटल कंपनी आणि क्रिएटिव्ह वाईब प्रॉडक्शन प्रस्तुत या चित्रपटात पाँडीचेरीसारख्या सुंदर निसर्गरम्य शहरात घडणारी मराठी माणसाची गोष्ट आहे. नवीन पिढीच्या नात्याचे प्रतिनिधित्व करणाऱया या चित्रपटात विस्थापित झालेले लोक कोणत्या पद्धतीची नाती निर्माण करतात यावर भाष्य केले आहे. 25 फेब्रुवारीला प्रदर्शित होणाऱया ‘पाँडीचेरी’मध्ये सई ताम्हणकर, वैभव तत्ववादी, अमृता खानविलकर, महेश मांजरेकर, नीना कुळकर्णी, गौरव घाटणेकर, तन्मय कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.



























































