वडवणीमध्ये राष्ट्रवादीचा दिमाखदार विजय; भाजपचा पराभव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बीड जिल्ह्यातील पाच नगर पंचायतच्या अध्यक्ष, उपनगराध्यक्षपदासाठी सोमवारी निवडणूक झाली. अटीतटीच्या समजल्या जाणाऱ्या वडवणी नगर पंचायतमध्ये भाजपाची हवा गुल झाली. राष्ट्रवादीचा दिमाखदार विजय झाला. वडवणीत राष्ट्रवादीचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाला. भाजपाने आपला पराभव लपवण्यासाठी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकला. शिरूर,आष्टी, पाटोदा या नगर पंचायतमध्ये आमदार सुरेश धस यांचा बोलबाला झाला. तर केज नगर पंचायतमध्ये केज शहर विकास आघाडीचा अपेक्षित विजय झाला.

बीड जिल्ह्यातील पाच नगर पंचायतच्या नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पदासाठी सोमवारी निवडणूक झाली. यामध्ये केज नगराध्यक्षपदासाठी एकच अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच पाटोदा आणि आष्टीतील नगराध्यक्षपदासाठीही एकच अर्ज आल्याने या दोन्ही नगर पंचायत आमदार सुरेश धस यांच्या ताब्यात गेल्या आहेत. केज नगर पंचायत केज विकास आघाडी यांच्या ताब्यात गेली आहे.

संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वडवणी नगरपंचायतच्या निवडणुकीकडे लागले होते. राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनलने 9 जागावर विजय मिळवला होता. तर भाजपाने 8 जागेवर विजय मिळवला होता. सोमवारी निवडणूकीपूर्वी प्रेमचंद नहार यांनी न्यायालयात धाव घेत भाजपाच्या एका सदस्यावर आक्षेप घेतला आणि तो आक्षेप मान्य केल्याने त्या सदस्याला ऐनवेळी मतदान करण्यापासून रोखण्यात आल्याने भाजपाची स्थिती दोलायमान झाली. 9 विरूद्ध 7 अशी लढत होणार असल्याचे दिसत असताना भाजपाने या निवडीवर बहिष्कार घालून आपला पराभव मान्य केला. वडवणीच्या नगराध्यक्षपदी वंदना शेषेराव जगताप तर उपनगराध्यक्षपदी बन्सीधर मुंडे यांची निवड करण्यात आली.

केज नगराध्यक्षपदासाठी एका उमेदवाराचा अर्ज प्राप्त झाला होता. त्यामुळे त्यांची निवड निश्चित होती. नगराध्यक्षपदी सीता प्रविण बनसोडे यांची तर उपनगराध्यक्षपदासाठी शितल पशुपतीनाथ दांगट यांची निवड झाली. आष्टी नगर पंचायतवर आमदार सुरेश धस यांचे निर्विवाद वर्चस्व निर्माण झाले आहे. नगराध्यक्षपदी पल्लवी स्वप्नील धोंडे तर उपनगराध्यक्षपदी शैलेश सहस्त्रबुद्धे यांची निवड करण्यात आली. पाटोदा नगर पंचायतवर आमदार सुरेश धस यांचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. नगराध्यक्षपदी सय्यद खतीजीबी सय्यद अमर यांची तर उपनगराध्यक्षपदी शरद बामदळे यांची निवड करण्यात आली. शिरूर-आष्टी, पाटोद्याप्रमाणे शिरूर नगर पंचायतवरही आ.सुरेश धस यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले. शिरूर नगर पंचायतच्या नगराध्यक्षपदी प्रतिभाताई पाटील यांची तर उपनगराध्यक्षपदी श्वेता देसरडा यांची निवड झाली.

अवघड विजय सोपा केला
वडवणी नगर पंचायत निवडणुकीमध्ये अवघड असलेला विजय आमदार प्रकाश सोळंके, माजी आमदार केशवराव आंधळे, बाबुराव पोटभरे यांच्या एकत्रित येण्यामुळे सोपा झाला आणि भाजपला हार मानावी लागली. मात्र खरी मेहनत घेतली ती जयसिंह सोळंके यांनी. गेल्या दोन महिन्यापासून वडवणी नगर पंचायत ताब्यात घेण्यासाठी परिश्रम आणि मेहनत जयसिंह सोळंके यांनी घेतली. 22 दिवसांपासून वडवणीचे 9 नगरसेवक संभाळण्याची जबाबदारीही त्यांच्याच खांद्यावर होती. अनेक अडीअडचणी आल्या. प्रत्येक अडचणींवर मात करत सोळंकेंनी आपली जबाबदारी सक्षमपणे पार पाडली आणि भाजपाला चारी मुंड्या चित्त केले.