
चाकूर तालुक्याजवळील नळेगाव मोडवर ट्रक – दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी घडली. लातूर – नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील घरणी गावाच्या जवळील नळेगाव रोडवर हा अपघात झाला.
या अपघातात मोटारसायकलस्वार द्वारकानाथ अर्जुन मद्रेवार (वय 42, रा. चापोली ता. चाकूर) यांचा जागीच मृत्यू झाला. द्वारकानाथ दुचाकीने जात होते. समोरुन येणाऱ्या ट्रकने मद्रेवार यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात ट्रकखाली सापडल्याने द्वारकानाथ यांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक कपिल पाटील, पोलीस जमादा लांडगे, पोलीस नाईक ईश्वर स्वामी, पोलीस अंमलदार एस.बी. कोळेकर यांनी पंचनामा केला. मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मृत द्वारकानाथ यांच्यापश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, दोन बहिणी आणि एक भाऊ असा परिवार आहे.
























































