
>> राजन वसंत देसाई
देशाचा विकास कशावर अवलंबून असतो, तर तो फक्त व्यक्ती विकासावरच. व्यक्ती विकास हा कधीच एखाद्या व्यक्तीने कुठल्या जातीत, धर्मात जन्म घेतला यावर अवलंबून नसून तो फक्त स्वगुणावर किंवा स्वतःच्या अंग मेहनतीने किंवा ज्ञानार्जनाने केलेल्या स्वकर्तृत्वावर अवलंबून असतो. उदाहरण द्यायचे झाले तर असे म्हणता येईल की, शेती हा व्यवसाय. माणसाला जिवंत राहण्यासाठी लागणाऱ्या मूलभूत गरजांचे घेऊया. अन्न, वस्त्र, निवारा त्यात आता आरोग्याची भर पडली आहे. या गोष्टी स्वकष्टाने मिळू शकतात आणि त्याला दुसरा पर्याय नाही. हे सारे सर्वांना माहीत असताना जाती-धर्म यावरून वितंडवाद कशाला? रक्तपात घडवल्यामुळेच स्वतःचा धर्म महान बनतो हा तर मूर्खपणाच नव्हे तर मानवाला लागलेला कलंक आहे. कारण वारा, ऊन, पाऊस, सूर्य, चंद्र, तारे, जमीन, एकूण निसर्ग हा धर्म जात विरहित असेल, तर माणसामाणसात भेदभाव करणारे तुम्ही-आम्ही कोण? मग परमेश्वर या मूळ संकल्पनेपासून आपण सारेच दूर जात आहोत. याचं उदाहरण घेऊया. आता आलेल्या कोरोनाच्या महामारीने सर्व जगालाच ग्रासले आणि सर्व जगातील सर्व धर्म, जाती, पंथ यांनाच याचे दुष्परिणाम भोगावे लागले. या महामारीने कुठला जातीभेद केला नाही. त्यावर आलेल्या लसीवर कोणत्या एका धर्माच्या मालकीचे लेबल नव्हते. जे रुग्ण रुग्णालयात वैद्यकीय सेवा घेत होते तेथेही सेवेकऱ्यांनी कोणताही धर्म, जात, पंथ पाहिला नाही. जो रक्तपुरवठा केला गेला त्या रक्ताचा रंगही वेगळा नव्हता की विशिष्ट धर्माचे रक्त रुग्णाला पुरवण्यात आले नाही. त्यामध्ये होता तो फक्त मानवतावाद आणि ही लढाई आपण जिंकणार असून ती केवळ आणि केवळ मानवतावाद याच भक्कम पायावर उभी राहणार आहे. म्हणूनच स्वकर्तृत्व हाच मानवाच्या प्रगतीमधला खरा आधार आहे आणि जात, पात, धर्म हा तर खरा अडसर आहे आणि दहशतवाद आणि आर्थिक महामारी यातून जर आपल्याला वाचायचे आणि वाचवायचे असेल तर स्वकर्तृत्वावर जोर द्यायला हवा.
आता मुद्दा असा येईल की, मग जात, पात, धर्म हे असू नये का? तर उत्तर प्रथम होकारार्थी असेल आणि दुसऱ्या बाजूने नकारार्थी असेल. आता होकारार्थी का? मानवनिर्मित जात किंवा धर्म हा जन्मानंतर सामाजिक वैशिष्टय़पूर्ण जाणिवेतून जन्माला आलेला असतो, पण त्याच जातीचे लेबल घेऊन मानवाची प्रगती कधीच होऊ शकत नाही. कारण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अत्यंत मोलाची व्याख्या जाती-धर्मविषयक भर सभेत ठणकावून सांगितली होती ती म्हणजे ‘प्रत्येक जातीला पोट असते, पण कुठल्याही पोटाला जात नसते’ कोणतेही मूल जन्माला आल्यानंतर मानवनिर्मित, सामाजिक संस्काराने त्याची जात, धर्म त्याच्या कपाळी लिहिले जाते. नंतर जेव्हा मूल मोठे होते तेव्हा चांगल्या-वाईट संस्कारातून त्याला जाती-धर्माच्या बंधनात मार्गक्रमण करावे लागते. जर समाज सुसंस्कृत, संस्कारक्षम शिक्षण देत असेल तर त्याचे भविष्य उज्ज्वल होणार, पण तेच मूल जर कुसंस्कारित समाजातील घरात पडले तर नागरिक म्हणून अकार्यक्षमता बनणार आणि त्याच्या हातून समाज प्रबोधनात्मक कोणतेच कार्य घडणार नाही. व्यक्तिमत्त्व विकास होणार नाही. धर्म आणि अधर्म यातील महत्त्वाचा भाग म्हणजे संस्कार आणि सुसंस्कृत संस्कारातून जन्माला येते ते स्वकर्तृत्व आणि सद्सद्विवेक बुद्धी आणि जेव्हा सद्सद्विवेक बुद्धी जागरूक असते, तेव्हा त्याच्या हातून नेहमी आदर्श विचारच रुजले जातात. समाजात त्याचे वेगळे स्थान निर्माण होते आणि पर्यायाने त्याचा परिवार भोवतालचा परिसर सुसंस्कृत बनवण्याची कुवत अंगी येते आणि दिशाहीन समाजातला सहृद वैचारिक पातळीवर नेतो. महात्मा जोतिबा फुले, प्रबोधनकार ठाकरे यांनी समाजातील अंधश्रद्धा दूर करून, समाजाला व्यावहारिक दृष्टिकोन समजावून, समाज फक्त शिक्षणाच्या जोरावर प्रगती करू शकतो याचे शिक्षण दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेतील तरतुदी पीडित वर्गाला दिल्या त्या समाजातील अनिष्ट भेदभाव मिटावा, मानवातले अंतर कमी व्हावे या हेतूनेच, पण पीडितांच्या दुःखाला त्यांनी लाचारीचे लेबल कधीच लावले नाही. स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षे (अमृत महोत्सव) झाली, पण जात-पात व्यवस्थेचे विष हे जनमानसात कायमच आहे.
जीवन जगतांना कोणताही धर्म, जात पाहिली जात नाही. कारण प्राणवायू सर्वांना हवा. तो एखाद्या जाती-धर्माला हवा आणि त्याची मक्तेदारी ठरावीक धर्मांकडे आहे असे होत नाही ना! मग ज्या प्राणासाठी वायूची गरज आहे तो प्राण जपण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी सर्वात मानव जातीने निकोप स्पर्धा ठेवून स्वकर्तृत्वाने अखंड मानवजातीचे कल्याण करण्याची गरज आहे. आज त्याच्यावर कोणीच बोलायला तयार नाही. कारण तोडा आणि फोडा आणि राज्य करा हा वाईट संदेश साऱ्या जगाला सर्वनाशाकडे नेणारा आहे.




























































