
सध्याच्या आधुनिक काळात केरळमध्ये एका इंजिनीअरने पारंपरिक शैलीचे, गावखेडय़ासारखं घर बांधले आहे. सिमेंट- विटांचा वापर न करता तांदळाचा भुसा आणि चुना वापरून घर बांधले आहे. वेगळ्या पद्धतीचे हे घर लोकांना फक्त आवडते असे नाही तर पाहणारे या घराच्या प्रेमात पडत आहेत.
केरळमधील त्रिचूर येथे इंजिनीअर असलेल्या दिनेश कुमार यांनी खेडय़ातील वास्तुरचनेनुसार स्वतःचे घर बांधायचे ठरवले. त्यासाठी त्यांनी केरळच्या ग्रामीण विकास केंद्रात डिझायनर आणि इंजिनीअर असलेल्या शांतीलाल यांना काम दिले. शांतिलाल यांनी घराच्या भिंतीसाठी सिमेंट-विटा वापरलेल्या नाहीत. त्याऐवजी लेटराइट दगडाचा वापर केला. लेटराइट हे दगड केरळ येथील पारंपरिक वास्तुरचनेचा महत्त्वाचा भाग आहे. याशिवाय सिमेंटऐवजी वाळू, चुना तसेच तांदळाचा भुसा, गूळ, हिरडा यांची पूड वापरली. घरातील काही भिंती प्लास्टरशिवाय त्यांच्या मूळ रूपात ठेवल्या. त्यामुळे घराच्या सौंदर्यात भर पडली. शांतिलाल यांनी ज्या ठिकाणी सिमेंटचे प्लास्टर केले त्या ठिकाणी मातीच्या टाइल्स लावल्या.
2700 चौरस फूट जागेवर 4 बेडरूम, एक स्वयंपाकघर, जेवणाची खोली, देवघर, बाल्कनी आणि बहुपयोगी जागा, मध्ये अंगण हे दिनेशकुमार यांच्या इकोफ्रेंडली घराचे वैशिष्टय़ आहे. घरामध्ये अंगण केले असून छताला जाळ्या लावल्या आहेत. या जाळ्यांमधून घरभर प्रकाश पसरतो. भिंतींना वॉटर बेस्ड रंग लावला आहे. घराच्या खिडक्या, दरवाजांसाठी लाकडाचा वापर केला आहे. ही लाकडे म्हैसूर येथून मागवली असून जुनी आहेत. मोठे स्वयंपाकघर, स्टडी रूम, मंदिर हे घराचे आकर्षण आहे. या इकोफ्रेंडली घराचे बांधकाम बघून ते खर्चिक असेल असे वाटते, पण हे बांधकाम खिशाला परवडणारे असल्याचे दिनेशकुमार यांनी सांगितले.
n नैसर्गिक घटकांचा वापर करून उभारलेल्या दिनेश कुमार यांच्या घरामध्ये थंडावा मिळतो. त्यामुळे पंख्यांचा वापर कमी करावा लागतो. घरात नैसर्गिक प्रकाश यावा यासाठी मध्ये अंगण केलेले आहे.






























































