
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तिसऱया टप्प्यासाठी रविवारी मतदान झाले. 16 जिह्यांतील 59 विधानसभा जागांवर 59.83 टक्के मतदानाची नोंद झाली. दुसरीकडे पंजाबची निवडणूक एकाच टप्प्यात पार पडली. येथे सर्व 117 जागांवर 64.27 टक्के मतदान झाले. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीला हिंसक वळण लागले. झाशीमध्ये सपा-भाजप कार्यकर्त्यांत हाणामारी झाली, तर हाथरसमध्ये भाजप नेत्याची हत्या झाली.
निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार उत्तर प्रदेश निवडणुकीच्या तिसऱया टप्प्यात एकूण 59 जागांसाठी 59.83 टक्के मतदान झाले. या टप्प्यात 627 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले. हाथरस, फिरोजाबाद, एटा, कासगंज, मैनपुरी, फरुखाबाद, कन्नौज, इटावा, ओरैया, कानपूर नगर, जालौन, झाशी, ललितपूर, हमीरपूर आणि महोबा जिह्यांत मतदानाचा तिसरा टप्पा पार पडला. एटा जिह्यात सर्वाधिक मतदानाची नोंद झाली. तिसऱया टप्प्याअंती उत्तर प्रदेशातील 172 जागांचे मतदान पूर्ण झाले आहे.
पंजाबमध्ये सर्व 117 विधानसभा जागांसाठी 64.27 टक्के मतदान झाले. यात पाच जिह्यांत 60 टक्क्यांपेक्षा कमी तर पाच जिह्यांत 70 टक्क्यांहून अधिक मतदान झाले. एकूण 1304 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले आहे. सकाळच्या सत्रात कमी मतदान झाले, मात्र दुपारनंतर मतदानाचा टक्का वाढला. या निवडणुकीत चरणजीत चन्नी, कॅप्टन अमरिंदर सिंग, भगवंत मान, प्रकाश सिंग बादल, सुखबीर बादल, नवज्योत सिंग सिद्धू, बिक्रम मजिठीया या दिग्गजांचे राजकीय भवितव्य ठरणार आहे.
धक्काबुक्की, हाणामारीच्या घटना
- उत्तर प्र्रदेशात अनेक ठिकाणी धक्काबुक्कीच्या घटना घडल्या, तर ईव्हीएमबाबतही अनेक तक्रारी नोंदवल्या गेल्या. झाशीच्या बबीना मतदारसंघातील सिमथरी गावात सपा व भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. परस्परांना लाठय़ाकाठय़ांनी मारहाण केली. यात कित्येकांना गंभीर दुखापत झाली. एका महिलेच्या ओळखपत्रावरून वाद भडकला.
- कानपुरातील जेके कॉलनीच्या बूथवर पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली.
- हाथरसच्या सिकंदराराऊ विधानसभा मतदारसंघात भाजप नेते कृष्णा यादव यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली. हत्या कोणी केली हे अजून उघड झालेले नाही.
- पंजाबमध्ये जालंधरमधील रैनक बाजार परिसरात एका बूथवर काँग्रेस आणि अकाली दलाचे कार्यकर्ते आमने सामने भिडले.
























































