
सोलापूर शहर व परिसरातील दुचाकी चोरणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली असून, त्याच्या ताब्यातून पाच दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.
दीपक वैकुंठ श्रीगन (रा. भाटकनगर, जुने विडी घरकुल) असे अटक केलेल्याचे नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात दररोज दुचाकींची चोरी होत आहे. पोलीस या चोरटय़ांच्या मागावर असताना, जुना हैदराबाद रोडवर दीपक श्रीगन याला सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्याकडे घरात लपवून ठेवलेल्या पाच दुचाकी आढळल्या. याची किंमत जवळपास दोन लाख रुपये आहे. या गाडय़ा चोरीच्या आहेत. या कारवाईतून एमआयडीसी पोलीस ठाण्यातील दोन, नळदुर्ग पोलीस ठाण्यातील एक, सदर बझार पोलीस ठाण्यातील एक व सोलापूर तालुका पोलीस ठाण्यामध्ये दाखल असलेले पाच गुन्हे उघडकीस आले आहेत. एमआयडीसी पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक नितीन पेटकर व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.




























































