
आंगणेवाडी श्री भराडी देवीच्या यात्रोत्सवाची शुक्रवारी ‘मोड’ यात्रेने सांगता झाली. यात्रोत्सवात गुरुवारी रात्रौ ‘महाप्रसाद’ प्रसादाची ताटे लावण्याचा लक्षवेधी सोहळा संपन्न झाला. यावेळी देवीचे दर्शन काहीकाळ भाविकांसाठी बंद करण्यात आले. आंगणे कुटुंबातील महिला डोक्यावरून प्रसादाची ताटे देवीला घेऊन जातानाचा सोहळा डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
रात्रौ विद्युत रोषणाईत मंदिर परिसर लखलखून गेला होता. अनंत आंगणे व मंडळाची टीम ड्रोन कॅमेराने या सर्वाचे चित्रीकरण करत होती. तसेच सीसीटीव्ही यंत्रणेच्या माध्यमातून यात्रेवर लक्ष ठेवले जात होते. आंगणे कुटुंबीय यांचे आदर्शवत नियोजन व प्रशासनाच्या सहकार्याने यात्रा यशस्वीपणे संपन्न झाली. यात्रा समाप्ती होते त्या दिवशी छोटे दुकानदार थाटलेली दुकाने उचलतात. याला ‘मोड’ यात्रा समाप्ती म्हणतात.
शुक्रवारी भाविकांसोबत आंगणे कुटुंबीय देवीचे दर्शन घेतात. यात्रेचा पहिला दिवस भाविकांचा व दुसरा दिवस आंगणे कुटुंबीय अशी प्रथा आहे. मात्र दुसऱ्या दिवशीही भाविकांची गर्दी असते. त्यामुळे आंगणे कुटुंबीय यांनाही रांगेत राहून देवीचे दर्शन घ्यावे लागले.
गतवर्षी कोरोना संसर्ग वाढल्याने भाविकांच्या अनुपस्थित केवळ आंगणे कुटुंबीय यांच्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले होते. त्यामुळे दोन वर्षांनी झालेला हा सोहळा भाविकांच्या मांदियाळीत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.




























































