लेख – मराठीची समृद्धता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> आकाश दी. महालपुरे

मराठी भाषा दिन किंवा अन्य काही निमित्ताने आपल्या मनात मराठी भाषेबद्दल प्रेम जागे होते, ते समाजमाध्यमांवर उथळपणे वाहते. मात्र आपल्याच राज्यात राज्याची भाषा सर्व शाळांमध्ये शिकण्याची सक्ती करण्यासाठी कायदा करावा लागतो आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी राष्ट्रपती महोदयांना काही हजार पोस्टकार्ड पाठवावी लागतात.

मराठी साहित्याने, मराठी भाषेने महाराष्ट्रातील संस्कृती आणि परंपरा जपण्याचे मोलाचे कार्य केले आणि आद्यकवी मुकुंदराज, म्हाइंभट, संत ज्ञानेश्वर या संतकवींच्या मदतीने इथल्या काव्याला आकार देत मराठी साहित्याला, मराठी भाषेला अत्युच्च उंचीवर नेऊन ठेवले. ‘इये मऱ्हाटीचिये नगरी । ब्रह्मविद्येचा सुकाळू करी । देणे घेणे सुखची वरी । होऊ दे या जगा ।। अशी विनवणी आपल्या गुरूंकडे करत संत ज्ञानेशांनीसुद्धा मराठी भाषेला प्रचंड समृद्धता आणली.

मराठी भाषेच्या सागरातील मोती प्रत्येकाला लाभले यात काडीमात्र संशय नाही. मात्र, माणूस म्हणून जेव्हा आपण जन्माला येतो तेव्हा त्याबरोबर एक संस्कृतीचंही नेतृत्व,आचरण करण्याची जबाबदारीदेखील आपल्यावर येत असते आणि याच संस्कृतीची ओळख बालवयापासूनच करून द्यायचं महत्त्वाचं काम मराठी कवितांनीसुद्धा केलं.

एक-एक कविता म्हणजे बस्स! समुद्रमंथनातून निघालेल्या रत्नांपेक्षाही मौल्यवान आणि परिसासमान. ज्या लोखंडास स्पर्श करून त्याचंही सोनं व्हावं अशा उंचीच्या त्या मराठी भाषेच्या कविता. सर्वात बलवान आहेत ते मराठी भाषेचे शब्द. ‘आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने। शब्दांचीच शस्त्रे यत्न करू’…असं तुकोबांनी म्हटले ते उगाच नाही. अशा कित्येक शब्दांनी प्रत्येकाच्या तारुण्याला सावरलं, न्यूनगंडाच्या परिस्थितीतून बाहेर काढलं, वैचारिक गुलामीचे पूर्णपणे साखळदंड तोडले. गझल असो वा कविता, कथा असो वा कांदबरी, प्रवासवर्णन असो वा नाटक, या साऱ्यांची नाळ इथल्या मातीशी, व्यवस्थेशी जोडली गेलेली होती म्हणून प्रत्येकाने मराठी साहित्याबरोबर, मराठी भाषेला कागदासोबत काळजातही उतरवलं. तिच्यावर प्रेम केलं. त्यातून प्रेम वाटलं, पसायदान मागितलं,

सारं कसं पहाटेच्या साखरझोपेत स्वप्नासारखं जगणं होतं, पण हे सारं कसं मागं पडत गेलं आणि शेवटी आमच्याच ‘मायमराठी’साठी आम्हाला झगडावं लागत आहे! किमान आता तरी केंद्र सरकारने मायमराठी भाषेला ‘अभिजात’ दर्जा द्यावा एवढीच कळकळीची विनंती.