
>> नंदन पाटील
पहिली जागतिक मराठी भाषा परिषद मुंबईत झाली. परिषदेचे अध्यक्ष कविश्रेष्ठ कुसुमाग्रज तथा विष्णू वामन शिरवाडकर होते. कुसुमाग्रजांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 27 फेब्रुवारी 1989 या दिवसापासून जागतिक मराठी अकादमीतर्फे मराठी भाषा दिवस साजरा होऊ लागला.
प्रतिभावंत कवी, विख्यात नाटककार, श्रेष्ठ कादंबरीकार, कथा लेखक, ललित साहित्यकार व समीक्षक म्हणून तात्यासाहेब शिरवाडकर यांची ख्याती होती. मराठी साहित्यातील सर्व अंगांना त्यांचा स्पर्श झाला होता. त्याविषयी म्हणता येईल –
म्हणौनि जे शिरवाडकरी साहित्यात नाही ते नोहेचि मराठी साहित्यात, येणे कारणे म्हणावे कुसुमाग्रजे स्पर्शिले समस्त मराठी साहित्य जगत!
तात्यासाहेबांच्या साहित्यात स्पष्टपणा, उद्बेधकता, जोम, ओज, आवेश हे गद्य गुण तसेच नादमयता, लय, तजेलदारपणा, नाटय़मयता व चित्रमयता हे पद्य गुण होते. महेश्वराचे ऐश्वर्य व उमेचे तापस सौंदर्य यांचा अपूर्व संगम त्यांच्या साहित्यात झालेला दिसतो. त्यांच्या अनेक कविता नंदादीपाप्रमाणे अखंड तेवत राहणाऱ्या आहेत. त्यांची प्रतिभा विविधतेने नटलेली व नवनवोन्मेषशाली आहे. म्हणूनच ते ही अशी भावना व्यक्त करू शकले…
प्रकाशाच्या पावलांनी चाहूल ये कानांवर
ध्वज त्याचे कनकाचे लागतील गडावर
काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात
क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत
आपल्या कवितेच्या अमरत्वाची ग्वाही देताना कुसुमाग्रज म्हणतात-
विजयासाठी माझी कविता कधीच नव्हती
म्हणून नव्हती भीती तिजला पराजयाची
जन्मासाठी हटून केव्हा नव्हती बसली
म्हणून नाही खंतही तिजला मरावयाची
स्वकाव्याची अशी समीक्षा करणारे कुसुमाग्रज शिक्षकांविषयी आदराने म्हणत, समाजाचा विकास सत्तेने होत नाही, यंत्राने होत नाही. तो आदर्श शिक्षकामुळे होतो. आज समाजात दुर्गुणांची संपत्ती वाढते आहे. अशा स्थितीत समाजाला सद्गुणांचा मार्ग दाखविणारा शिक्षक हाच खरा आधार आहे.
वाचे बरवे कवित्व, कवित्वी रसिकत्व
रसिकत्वी परतत्त्व स्पर्शू जैसा
लौकिक, अलौकिक, पारलौकिक अनुभव विश्व समर्थपणे पेलणारे कुसुमाग्रज श्रेष्ठ महर्षी होते. अशा पदवींपुढे पद्मभूषण पदवीला अर्थ तो काय? बहुतेकांना हवेहवेसे वाटणारे सन्मान नाकारणारे असे त्यांचे अनोखे व्यक्तिमत्त्व होते. कार्लाइल म्हणत असे, “He is the Hero who says No!”
‘‘नाही’’ म्हणून पाय घट्ट रोवणारा मनुष्य गमतीखातर ‘‘नाही’’ म्हणत नाही. त्यामागे विचारधारा, अनुभव, चिंतन आणि मूल्यामूल्य विवेक असतो. कुसुमाग्रजांनी शासनाचं अनुदान नाकारले, पुरस्कार नाही. श्रेष्ठ कवी दान घेत नाही, पुरस्कार घेतो. साहित्यातील नोबेल विजेत्यांच्या कविता वाचक विसरतील, परंतु रसिकांनी आपल्या हृदयात साठविलेल्या कुसुमाग्रजांच्या कविता हृदयातून कंठात व कंठातून अधरांद्वारे विश्वाच्या अंतापर्यंत पाझरत राहतील. त्यांच्या साहित्याचे इंग्रजी भाषेत रूपांतर झाले असते तर त्यांचे नोबेल दूर नसते, पण तात्यासाहेबांसारख्या नोबेल महर्षीला त्या नोबेलची काय तमा?
‘आदित्य या तिमिरात व्हा, ऋग्वेद या हृदयात व्हा’ म्हणणारी कुसुमाग्रजांची कविता मानवतेला देवत्वाप्रत नेणाऱया व्यापक सुसंस्कृत सभ्यादराचे सुचिन्ह आहे. कुसुमाग्रज नावाचा एक तारा साहित्य क्षितिजावर उगवला, तेजाची पूजा करीत तेजाने तळपत आकाशातील एक स्वयंप्रकाशित तारा बनला. तोच तारा महाराष्ट्र भूमीचा देवदूत होऊन अवतरला.
‘मराठी असे आमुची मायबोली, जरी आज ती राजभाषा नसे’ असे निराशाजनक उद्गार फार पूर्वी कवीने उच्चारले होते. अलीकडच्या काळात मराठी भाषेची होणारी पीछेहाट पाहून कुसुमाग्रजांनी म्हटले होते, आज मराठी फाटक्या वस्त्रांनिशी महाराष्ट्र मंत्रालयाच्या दारात उभी आहे. म्हणूनच मराठी भाषा दिवस हा मराठी भाषेविषयी आस्था, संवर्धन व प्रेम निर्माण करण्याचे एक प्रभावी माध्यम झाले आहे. अशा प्रसंगी मराठी भाषाप्रेमींनी मातृभाषेच्या महानतेचे चिंतन करणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी जागतिक मराठी अकादमीने मराठीच्या उत्कर्षासाठी मराठी भाषा दिवस हे व्यासपीठ निर्माण केले आहे.
ज्ञानेश्वरांनी मराठीविषयी ‘माझा मराठिचिया बोल कवतुके, परि अमृतातेही पैजेसी जिंकी, ऐसी अक्षरे रसिके मेळविन’ असे गौरवोद्गार काढले आणि फादर स्टीफन यांनी ‘जैसी पुस्पामाजी पुस्प मोगरी, तैसी भासांमाजि साजिरी मराठिया’ असे अभिमानपूर्वक वर्णन केले. मराठीविषयी स्वाभिमान व्यक्त करताना कुसुमाग्रज आग्रहपूर्वक सर्वांना आवाहन करतात…
परभाषेतही व्हा पारंगत ज्ञानसाधना करा,
परि मायमराठी मरते इकडे
परकीचे पद चेपू नका
भाषा मरता देशही मरतो
संस्कृतिचाही दिवा विझे
गुलाम भाषिक होऊनि अपुल्या
प्रगतीचे शिर कापू नका
आणि माझ्या मराठी मातीचा
लावा ललाटास टिळा
अशी विनवणीही करतात. कवी बा.भ. बोरकर यांनी कुसुमाग्रजांच्या ‘गर्जा जयजयकार क्रांतीचा’ या कवितेचा पोर्तुगीज भाषेत अनुवाद करून पोर्तुगीज भाषिक लेखिकेला वाचण्यास दिला. वाचून झाल्यानंतर ती म्हणाली, ही कविता मार्सेलाज या फ्रेंच राष्ट्रगीतापेक्षा श्रेष्ठ प्रतीची आहे.
कुसुमाग्रजांना कारुण्याची जाण होती. ते कारुण्य उत्तुंग कर्तृत्वात वावरते, ते जगण्याची भीक मागण्यापेक्षा पाठीवर थाप मारून लढण्याचे आवाहन करते, सर्वात्मका सर्वेश्वरा गंगाधरा शिवसुंदरा असे पसायदान मागते, माझे म्हणा करुणाकरा हा मानवतेचा संदेश देते. त्यांची स्वगते कविमनाची निदर्शक आहेत. सौंदर्य, न्यायबुद्धी, स्वातंत्र्य व प्रेम ही कविमनाची भूषण व अंगदेखील!
समिधाच सख्या या त्यात कसा ओलावा
कोठून फुलापरि वा मकरंद मिळावा
जात्याच रुक्ष या, एकच त्या आकांक्षा
तव अंतरअग्नी क्षणभर तरी फुलवावा
अशी आकांक्षा मनःपूर्वक करणारे सत्य-शिव-सुंदराचे उपासक व संन्यस्त वृत्तीचे ऋषितुल्य तात्यासाहेब म्हणजे साक्षात आशीर्वादच होते.
भाषा अक्षय असते. मात्र तिचा विकास व संवर्धन करण्याचा ध्यास हवा. तो ध्यास मराठी भाषा दिनाच्या आणि कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जन्मादिनानिमित्त धरणे हीच कुसुमाग्रजांना हार्दिक श्रद्धांजली ठरेल!
(लेखक ज्येष्ठ कवी आहेत.)



























































