15 मार्चपासून शाळेत शिजविला जाणार पोषण आहार, प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनामुळे गेली दोन वर्षे प्रत्यक्ष शाळेमध्ये पोषण आहार शिजवून देण्याची प्रक्रिया बंद करण्यात आली होती. मात्र, विद्यार्थ्यांना कोरडय़ा स्वरूपातील धान्य व धान्यादी मालाचे वाटप केले जात होते. आता शाळा नियमित सुरू असून, विद्यार्थ्यांची उपस्थिती नियमित झाली आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्यात 15 मार्चपासून विद्यार्थ्यांना शिजवून मध्यान्ह भोजन योजनेचा लाभ देण्याचे आदेश राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या वतीने देण्यात आले आहेत.

शालेय पोषण आहार योजनांमुळे विद्यार्थ्यांची वर्गातील उपस्थिती वाढण्यास मदत होते. आता शाळा सुरू होऊन एक महिन्यापेक्षा अधिक काळ झाल्याने सदरची योजना सुरू करावी, अशी मागणी पालक व शिक्षक वर्गातून करण्यात येत होती. सदरच्या मागणीचा विचार करून राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयाने पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना कोरोना नियम पाळून आहार शिजवून देण्याचे आदेश दिले आहेत.

राज्यातील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना ‘मध्यान्ह भोजन योजने’चा लाभ देण्यात येतो. पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी 450 उष्मांक आणि 12 ग्रॅम प्रोटीनयुक्त आहार देण्याची तरतूद आहे. तर, सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी 750 ग्रुप उष्मांक आणि 20 ग्रॅम प्रोटीन उपलब्ध करून देण्याची तरतूद आहे. त्यानुसार पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी 100 ग्रॅम तांदूळ व 20 ग्रॅम डाळ दिली जाणार आहे. सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी 150 ग्रॅम तांदूळ व 30 ग्रॅम डाळ व इतर मसालेयुक्त पदार्थ व तेल उपलब्ध करून दिले जाणार आहे. यासाठी सरकारकडून प्राथमिक स्तरासाठी धान्यादी माल खरेदी करण्याकरिता प्रतिदिन प्रतिविद्यार्थी दोन रुपये 29 पैसे, तर उच्च प्राथमिक सहासाठी तीन रुपये पैसे दिले जाणार आहे. इंधन व भाजीपाला अनुदानासाठी प्राथमिक स्तरावर ती दोन रुपये 68 पैसे व उच्च प्राथमिक शाळासाठी चार रुपये दोन पैसे निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

जिल्हास्तरावरून ठरविणार पाककृती

विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणाऱया धान्यादी मालाचा विचार करून प्रत्येक जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी यांनी शाळांबाबत पाककृती निश्चित करावयाची आहे. या संदर्भात पाच मार्चपर्यंत संबंधितांना लेखी आदेश देण्याचे आदेश शिक्षण संचालकांच्या वतीने देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना आठवडय़ातून एकदा पूरक आहार उपलब्ध करून देण्यात येणार आहे. संबंधित तपशील दर्शनी भागात लावण्यात यावा. मार्च व एप्रिल या कालावधीत 43 दिवस कार्य दिन ग्राह्य धरण्यात येणार आहेत. तर, 12 मार्चपर्यंत शाळा स्तरावर वितरण होईल, यादृष्टीने प्रयत्न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

स्वयंपाकी कर्मचाऱयाला दोन्ही डोस बंधनकारक

नियुक्त करण्यात आलेला स्वयंपाकीच्या आरोग्याबाबत वैद्यकीय प्रमाणपत्रदेखील उपलब्ध करून देण्यात यावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. त्याने दोन्ही कोरोनाच्या लसी घेणे आवश्यक असून, तसे प्रमाणपत्र उपलब्ध करून द्यावे. संबंधित कर्मचाऱयांच्या घरातील कोणी व्यक्ती कोरोनाबाधित झाल्यास संबंधितांनी तत्काळ माहिती शाळांना द्यावी. शाळेमध्ये मास्क वापरणे आवश्यक करण्यात आले आहे. संबंधित कर्मचाऱयांचे नियमित तापमान घेण्यात यावे. नियमित हात धुण्यासाठी साबणाचा वापर करावा. कर्मचाऱयांनी हेड कव्हरचा वापर करावा. हातमोजे वापरावेत, असेही निर्देश देण्यात आले आहेत.

एमडीएमवर माहिती अद्ययावत करण्याचे आदेश

राज्यातील प्रत्येक शाळेत शालेय पोषण आहार योजना उपलब्ध करून देण्यात आली आहे. या योजनेची माहिती शासनस्तरावरून शालेय पोषण आहार योजनेसाठी विकसित करण्यात आलेल्या पोर्टलवरती शाळेचे मुख्याध्यापक, योजनेचे काम पाहणारे शिक्षक, शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांची माहिती अद्ययावत करण्यात यावी. मोबाईल ऍप डाऊनलोड करून घ्यावे, पहिल्या दिवसापासूनच सदरची माहिती अचूक भरण्यात यावी. केंद्रप्रमुख लॉगिन करून पासवर्ड अपडेट करण्यात यावेत. पटसंख्या नियमित नोंद घ्यावी. सदरची कामे 11 मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या योजनेची देयके भरण्यात आलेल्या माहितीवरून देण्यात येणार आहेत.

स्वच्छता राखा पोषण आहार योजना सुरू करण्यात आली असल्याने संबंधित परिसर निर्जंतुकीकरण करण्यात यावा. हवा खेळती राहील, असे पाहावे. धान्यादी मालाची साठवणूक उत्तम करण्यात यावी. पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था असावी. त्याठिकाणी संबंधित व्यक्तीशिवाय इतर व्यक्तींना मजाव करण्यात यावा. आहार शिजवण्यासाठी जागा स्वच्छ ठेवण्यात यावी. आहार वाटप करताना 65 डिग्री सेल्सिअस तापमान ठेवावे. एका ताटात एकाच विद्यार्थ्याला आहार उपलब्ध करून देण्यात यावा. जेवणापूर्वी विद्यार्थ्यांनी स्वच्छ हात धुणे आवश्यक आहे. सामाजिक अंतराचे, नियमांचे पालन करावे.
– दिनकर टेमकर, शिक्षण संचालक.